कामात हयगय व प्रलंबितता खपवून घेतली जाणार नाही – आयुक्तांचे आरोग्य विभागास निर्देश
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाताना आवश्यक तयारी तत्परतेने करण्याची गरज असून यामध्ये आरोग्य विभागाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व कामे विहीत वेळेत पूर्ण करावीत व कोणत्याही कामाची नस्ती विभागात 7 दिवसापेक्षा अधिक राहता कामा नये, किंबहुना प्रत्येक अधिकारी, कर्मचा-याने आपल्याकडे आलेल्या नस्तीवर त्वरीत कार्यवाही करून ती पुढील अधिका-याकडे पाठविण्याचे काम जलद करावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा चालणार नाही असे त्यांनी आरोग्य विभागाच्या विशेष बैठकीत सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर स्पष्ट केले.
कोव्हीडच्या अनुषंगाने आरोग्य विभागाला सर्वाधिक महत्व दिले जात असून याचे गांभीर्य ओळखून काम व्हायला हवे याची जाणीव आरोग्य विभागातील उच्च अधिका-यांपासून कर्मचा-यांपर्यंत सर्वांना व्हावी यासाठी एकत्रितपणे ही विशेष बैठक घेत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, डॉ. उज्वला ओतुरकर, डॉ. अजय गडदे तसेच आरोग्य विभाग मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोव्हीड 19 विरोधातील लढाईत जबाबदारीने काम करण्याची गरज असून प्रत्येकाने नियमानुसार विहित कालावधीत काम करण्यावर भर द्यावा. त्या त्या वेळेतील कामे त्याच वेळी करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रलंबितता चालणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. एखाद्या कामात हेतूपुरस्सर विलंब केला जातोय अथवा योग्य हेतू (Bonafide Interest) व्यतिरिक्त इतर काही उद्देशाने प्रेरित कार्यवाही केली जाते असे निदर्शनास आल्यास ऑन द स्पॉट कारवाई करण्यात येईल अशा कडक शब्दात त्यांनी समज दिली.
आपल्याकडे सोपविलेले काम करताना कार्यसंहिता पाळा व जबाबदारीने काम करा तसेच तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदी, जैविक कचरा व्यवस्थापन अशा अनेक महत्वपूर्ण बाबींची निविदा प्रक्रिया व संपूर्ण कार्यवाही जलद करा असे यावेळी निर्देश देण्यात आले. सध्या सुरु असलेल्या कामांची मुदत संपत असेल तर त्याकडे काटेकोर लक्ष देऊन मुदतीपूर्वीच किमान 3 महिने आधी निविदा प्रक्रिया सुरु करावी असेही सूचित करण्यात आले. यामध्ये कोणतीही ढिलाई चालणार नाही व कसूर केल्याचे दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.
सध्या कोव्हीड हीच जगापुढील सर्वात मोठी समस्या असून त्यात आरोग्य विभागाची जबाबदारी मोठी आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आले आहे तसेच महानगरपालिकेच्या इतर विभागातील मनुष्यबळही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्याकडून असलेल्या अपेक्षा ओळखून जबाबदारीने व जलद आणि गुणवत्तापूर्ण काम करावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिले.