वॉटरप्लस मानांकन हे अभिनंदनीय, तितकेच स्वच्छतेत सातत्य राखण्याची जबाबदारी वाढविणारे – नमुंमपा आयुक्त श्री. अभिजीत बांगर
नवी मुंबई महानगरपालिकेस ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ अंतर्गत ओडीएफ कॅटेगरीमध्ये लाभलेल्या ‘वॉटर प्लस’ या सर्वोच्च मानांकनामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचेप्रमाणेच नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे अशा सर्वच घटकांनी उत्तम कामगिरी केली असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मात्र आता हा सन्मान मिळाल्यानंतर यापुढील काळात हे मानांकन टिकविण्याची आपली जबाबदारी वाढली असल्याचे भान राखून अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्वच्छतेविषयीच्या आढावा बैठकीप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केले. स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
15 ऑगस्ट रोजी रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या तयारीला सुरूवात करण्यात आली असून त्या अनुषंगाने स्वच्छताविषयक राबविण्याच्या नवीन संकल्पनांचा व पुढील कार्यवाहीचा आराखडा महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर मांडण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळीच नवी मुंबई महानगरपालिकेस ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ अंतर्गत ओडीएफ कॅटेगरीमध्ये ‘वॉटर प्लस’ हे सर्वोच्च मानांकन जाहीर झाल्याने या बैठकीस अधिकारी, कर्मचारी उत्साहाने उपस्थित होते. हा उत्साह कायम राखून मिळालेल्या मानांकनाने संतुष्ट न राहता यापुढील काळात हे सर्वोच्च मानांकन टिकविण्यासाठी जागरूकतेने प्रयत्न करण्याचे भान राखणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच इतर विभागप्रमुख आणि अभियांत्रिकी, स्वच्छता, उद्यान या विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छतेविषयी सुरूवातीपासूनच चांगले काम होत असल्याने नवी मुंबईकडे सर्वांकडून अपेक्षेने पाहिले जाते. त्यामुळे आपल्या कामाचा दर्जा सतत उंचावत नेणे हे आपले कर्तव्य असून यावर्षी नियोजन केलेल्या स्वच्छतेविषयीच्या तीन टप्प्यातील आराखड्यानुसार पहिल्या 2 ऑक्टोबरपर्यंतच्या टप्प्यात घरातील कच-याचे घरातच ओला, सुका आणि घरगुती घातक असे 100 टक्के वर्गीकरण केले जाणे व या वर्गीकरण केलेल्या कच-याचे आपल्याकडून वेगवेगळे संकलन केले जाणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण करणे या बाबीकडे अत्यंत गंभीरतेने लक्ष द्यावे असे अधिकारी, कर्मचारी यांना सांगत ज्या सोसायट्या कचरा वर्गीकरण करून देणार नाहीत त्यांचा कचरा उचलला जाणार नाही अशी कठोर भूमिका शहराच्या भल्यासाठी घ्यावी लागेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचवेळी नागरिकांकडून वर्गीकरणाची अपेक्षा करताना आपल्या स्वच्छता कर्मचा-यांकडून नागरिकांनी वेगळा दिलेला कचरा नंतर एकत्र संकलीत करून घेतला जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीरतेने घेऊन संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या रक्कमेची दंडवसूली करण्यात येईल तसेच संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांचीही जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
रस्त्यावर कचरा पडलेला आहे असे एकही ठिकाण असता कामा नये तसेच सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालये नियमित स्वच्छ असणे गरजेचे आहे हे सांगत याबाबत कुठेही अस्वच्छता दिसल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्वच्छता ही कायमस्वरूपी राखण्याची बाब असून त्यादृष्टीने आपण अगदी लवकर 15 ऑगस्टपासूनच आपल्या अभियानाला सुरूवात केलेली असून नागरिकांच्या सक्रीय सहभागाखेरीज यश शक्य नाही हे लक्षात घेऊन घरातील कचरा वर्गीकरण करण्यापासून ते स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न वाढविण्याच्या आयुक्तांनी सूचना केल्या.
‘झिरो वेस्ट मॉडेल’ आपण 5 झोपडपट्टी भागात राबविलेले असून ही संकल्पना नवी मुंबईतील सर्वच झोपडपट्टयांमध्ये एवढेच नव्हे तर सेक्टरमध्येही राबविण्याचे आपले उद्दिष्ट असून त्यादृष्टीने विभाग अधिकारी यांनी हे चॅलेंज म्हणून स्विकारावे असे आवाहन आयुक्तांनी केले. त्यासाठी प्रमाण कार्यप्रणाली (SOP) तयार करून नियोजनबध्द आखणी करीत ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ तसेच ‘झिरो वेस्ट सेक्टर मॉडेल’ यशस्वीपणे राबवावे असे आयुक्तांनी निर्देश दिले.
________________________________________________
‘रस्ते दत्तक योजना’ ही शहर स्वच्छतेवर नागरिकांचा थेट वॉच असणारी एक अभिनव संकल्पना असून त्याचीही कार्यपध्दती लवकरात लवकर तयार करून ती राबवावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक भागातील मुख्य रस्ते निवडून, त्या मार्गाचा आरंभ व शेवट निश्चित करून घ्यावा व निश्चित केलेल्या कार्यप्रणालीनुसार त्या रस्त्यावर असलेल्या सोसायट्या, संस्था, नागरिक यांच्यामार्फत ते रस्ते स्वच्छतेसाठी दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. याविषयीच्या तक्रार निवारणासाठी (Publis Grievance) स्वतंत्र माध्यम निर्माण करावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
दैनंदिन 50 किलोपेक्षा अधिक प्रमाणात कचरा निर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, आस्थापना यांच्याकडील ओल्या कच-यावर त्यांच्या आवारातच प्रक्रिया प्रकल्प राबविण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा अभिमान असतो तसेच आपण राहतो त्या शहराविषयीदेखील अभिमान असतो. त्यामुळे नागरिकांचा आपल्या शहराविषयीचा अभिमान वृध्दींगत होईल अशाप्रकारे शहर अधिक स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी काम करावे, जेणेकरून नागरिक स्वयंप्रेरणेने शहर स्वच्छतेत सहभागी होतील असे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांचा स्वच्छतेमधील सहभाग वाढावा याकरिता अधिक व्यापक स्वरूपात माहिती प्रसारण व जनजागृती करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
शहर स्वच्छता ही आपली जबाबदारी असून नवी मुंबईसारख्या क्षमता असणा-या शहराकडून अर्थातच सर्वांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मिळालेल्या यशाने अल्पसंतुष्ट न होता वॉटरप्लस मिळाले, आता पुढे काय याचा गांभीर्याने विचार करून शहर स्वच्छतेविषयी अधिक चांगले काय करता येईल याकरिता अधिक कृतीशील व्हावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारीवृंदाला दिले.