घणसोली विभागाला भेट देत आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी तपासला कोव्हीडचा ऑनग्राऊंड रिपोर्ट
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
परदेशातून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांबाबत नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत दक्ष असून विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त यादीनुसार या प्रवाशांच्या प्रकृतीकडे कॉल सेंटरमार्फत नियमित संपर्क साधून लक्ष ठेवले जात आहे. ब्रिटनमधून गोठिवली परिसरात आलेला प्रवासी व त्याची आई कोरोनाबाधित असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याने त्यांचे त्वरित रूग्णालयीन विलगीकरण करण्यात आले असून ओमायक्रॉन व्हेरिएंटची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आलेले आहेत.
ओमायक्रऑनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिलेले असून टेस्टींगमध्ये वाढ व लसीकरणाला गती अशा दोन्ही प्रकारे गतीमान कार्यवाही केली जात आहे. त्यामध्ये घणसोली विभागात गोठिवलीमध्ये परदेशातून आलेला प्रवासी कोरोना बाधित आढळल्याने आयुक्तांनी थेट घणसोली विभागाला भेट देत तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली.
घणसोली व नोसीलनाका या दोन्ही नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून याविषयीची सविस्तर माहिती आयुक्तांनी घेतली. हा प्रवासी आणि त्याची आई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या इमारतीत टेस्टींग कॅम्प आयोजित करून प्रत्येक माणसाचे व त्यांच्याकडे विविध कामांसाठी येणा-या कामगारांचे टारगेटेड टेस्टींग करण्यात आल्याची व त्यामध्ये 6 पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिल्यानंतर सात दिवसांनी पुन्ही टेस्टींग करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे त्या इमारतींमध्ये प्रवेश संपूर्ण प्रतिबंधित राहील याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश घणसोली विभाग अधिकारी यांना देण्यात आले.
अशाच प्रकारची खबरदारी परदेशातून आलेला कोणताही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याठिकाणी घेण्यात यावी असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा जोपर्यंत ओमायक्रॉन टेस्टींग अहवाल येत नाही तोपर्यंत संशयित म्हणून शासकीय ट्रिटमेंट प्रोटोकॉल काळजीपूर्वक जपावा असे आदेश दिले.
महत्वाचे म्हणजे परदेशातून प्रवास करून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस काही लक्षणे जाणवत असल्यास त्याला टेस्टींगसाठी घराबाहेर न बोलावता त्याच्या घरी जाऊन संपूर्ण काळजी घेत त्याचा स्वॅब टेस्टींगसाठी घ्यावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
साधारणत: 12 नोव्हेंबरपासून परदेशातून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती महानगरपालिकेकडे असून त्यांची सूची तयार करून त्यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती जाणून घेण्याचेही यावेळी निर्देशित करण्यात आले. यामध्ये एकही प्रवासी राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिेले. तसेच रूग्ण आढळलेल्या प्रत्येक सोसायटीमधील प्रत्येकाची टेस्टींग होईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचेही आदेशित करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, परिमंडळ उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील व वैद्यकीय अधिकारी, विभाग अधिकारी उपस्थित होते.
एखादा परदेशी नागरिक आपल्या सोसायटीमध्ये आल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस 022-27567460 या क्रमांकावर त्वरित कळवावी असे सोसायटी पदाधिकारी यांना आवाहन करतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मास्क हीच कोरोनापासून वाचण्यासाठी आपली सर्वात मोठी ढाल आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करावा आणि कोव्हीड लसीकरण त्वरित करून घ्यावे तसेच विविध आस्थापनांनीही मास्क आणि लसीकरण नाही तर प्रवेश नाही या तत्वाचा अवलंब करावा असे सूचित केले आहे.