नवी मुंबई

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोव्हीड लसीकरण जम्बो सेंटरला सुरूवात

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेची पूर्वतयारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू केलेली आहे. याचा आढावा आयुक्त श्री. अभिजीत बांगर नियमित घेत असून यामधील एक महत्वाची बाब असलेल्या कोव्हीड लसीकरणाकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे. 31 जुलैपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील 45 वर्षांवरील 100 टक्के व्यक्तींना कोव्हीड लसीचा किमान एक डोस तरी दिला पाहिजे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नियोजन करण्यात येत आहे. त्याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असला तरी लसी उपलब्ध झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व लसीकरणाची कार्यवाही लगेच सुरू करता यावी यावर आयुक्तांचा विशेष भर असून त्यादृष्टीने नागरिकांना सुविधाजनक नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

अशाच प्रकारचे एक विशेष जम्बो लसीकरण केंद्र वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आजपासून सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज 1000 व्यक्तींना लसीकरण करण्याची क्षमता असून मंचावर लसीकरण बूथ व प्रेक्षागृहातील आसनांच्या ठिकाणी प्रतिक्षा आणि निरीक्षण कक्षाची रचना करण्यात आलेली आहे.

सध्या महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली ही 3 रुग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, 23 नागरी आरोग्य केंद्रे त्याचप्रमाणे एपीएमसी दाणा बाजार येथील ग्रोमा सेंटर, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनीट तसेच इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅंड सेंट्रल मॉल सीवूड नेरूळ या दोन्ही मॉलमधील ड्राइव्ह इन लसीकरण आणि सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयातील जम्बो लसीकरण केंद्र अशा 32 ठिकाणी लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये आता विष्णुदास भावे नाट्यगृहातील जम्बो लसीकरण केंद्राची भर पडलेली आहे. याशिवाय लसीकरण केंद्रात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने विविध विभागांत 50 समाजमंदिरे, शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे.

संपूर्ण वातानुकूलीत असलेले विष्णुदास भावे नाट्यगृहातील लसीकरण केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण असून इतर लसीकरण केंद्रांवरही मे महिन्यातील उन्हाळा लक्षात घेता तसेच सध्या तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेला पाऊस आणि आगामी पावसाळी कालावधीचा अंदाज घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी मंडप घालण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याठिकाणी खुर्च्या आणि पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान ( ८४ ते ११२ दिवसांदरम्यान ) घ्यावयाचा असून कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच ४ ते ६ आठवड्यांदरम्यान (२८ ते ४२ दिवसांदरम्यान ) घ्यावयाचा आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लक्ष 57 हजार 808 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यामधील 92 हजार 736 नागरिकांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण 3 लक्ष 50 हजार 544 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याने याही बाबीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रांवर दोन्ही लसींच्या नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या लसीचा साठा ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे.

सध्याचा लसीची मर्यादीत उपलब्धता लक्षात घेऊन प्राधान्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येत आहे. दररोज संध्याकाळी दुस-या दिवसाच्या लसीकरणाचे वेळापत्रक त्या केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसीच्या संख्येसह महानगरपालिकेच्या वतीने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम व व्हॉट्स ॲप अशा सर्व सोशल मिडीयाव्दारे जाहीर करण्यात येत असून लसीकरणात नागरिकांचे संपूर्ण सहकार्य लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button