वाशी सार्वजनिक रुग्णालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी केली वैद्यकीय सेवांची पाहणी
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणा-या वैद्यकीय सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला पूर्वसूचना न देता अचानक भेट देत विविध बाबींची पाहणी केली.
सद्यस्थितीत डेंग्यू आजाराचा वाढता प्रसार काहीसा आटोक्यात येताना दिसत असून सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे उपचार घेत असलेल्या संशयीत डेंग्यू रुग्णांच्या वॉर्डला भेट देत आयुक्तांनी आरोग्य स्थितीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला. तेथील काही रुग्णांशी संवाद साधून त्यांनी पुरविण्यात येणा-या सुविधांविषयी थेट माहिती घेतली.
अनेकदा रुग्णांना प्लेटलेट्सची गरज भासते. त्याची पूर्तता नवी मुंबई महानगरपालिकेनेमार्फतच करण्याचे आदेश यापूर्वीच आयुक्तांनी निर्गमित केलेले असून त्यानुसार कार्यवाही होत असल्याबाबत त्यांनी तपासणी केली.
वाशी रुग्णालयातील रक्तपेढीची पाहणी करीत तेथील रक्तसाठ्याची उपलब्धतता व प्लेटलेट्सची आवश्यकता भागविण्याची विद्यमान पध्दत याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. रक्तपेढीला भासणारी रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी सद्यस्थितीत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे अशी सूचना आयुक्तांनी केली.
वाशी रुग्णालयामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रुबी एलकेअर सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून चालविण्यात येणा-या सिटी स्कॅन सेंटरमधील चाचण्यांच्या पध्दतीची आयुक्तांनी बारकाईने माहिती घेतली तसेच मागील तीन महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या सिटी स्कॅनच्या विविध प्रकाराचे संगणकीय अहवाल तपासले. यामध्ये सद्यस्थितीत एचआरसीटी तपासणी संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद करत आयुक्तांनी कोव्हीड तपासणीसाठी सरसकट एचआरसीटी तपासणी न करता त्यापूर्वी ॲन्टिजन, आरटी-पीसीआर टेस्ट कराव्यात व त्यानंतरच वैद्यकीय गरज लक्षात घेऊन एचआरसीटी सूचवावी अशा सूचना दिल्या.
महापालिका रुग्णालयातून हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयात संदर्भित केल्या जाणा-या रुग्णांची कागदपत्राविना आडवणूक होऊ नये याकडे बारकाईने लक्ष देत याबाबतची प्रणाली अद्ययावत करून घ्यावी व तेथील संदर्भित रुग्णांच्या दाखल होण्याच्या व बरे होऊन घरी परतण्याच्या नोंदी नियमित ठेवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालयांमधील स्वच्छता चांगल्या प्रकारे राखली जात असून त्याची दखल विविध पातळीवर घेतली जाते असे सांगत हाच लौकीक कायम राहील यासाठी दक्ष राहण्याचे निर्देशही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.