उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी
उरण (दिनेश पवार) : मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरील बीच हे गर्दीची ठिकाणे आहेत त्यामुळे तेथील बीच सोडले तर पर्यटकांना उरण पिरवाडी बीच हा जवळचा आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत खोपोली या परिसरातील तसेच स्थानीक उरण परिसरातील जनता पर्यंटनाससाठी येथे येत आहेत.
उरणला तसे चारी बाजूने समुद्राने वेढलेले आहे. परंतु पिरवाडी बीच हा निसर्गसंपन्न डोंगर कुशीत आहे. समोरच पूर्वेला द्रोणागिरी हा भला मोठा डोंगर उभा आहे. आजूबाजूचा परिसरही गर्द झाडीने भरलेला आहे. तसेच समुद्राचे पाणी ही नितळ असल्याने पर्यटक आपला आनंद पाण्यामध्ये मनमुरादपणे लुटतात. लहान मुले तसेच मोठी मंडळी ही वाळूमध्ये खेळण्याचा आनंद लुटत आहेत. मन मोकळे पणाने आनंद लुटण्यास मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा या उरणच्या पिरवाडी समुद्रावरील बीचकडे वाढत आहे.
सद्यस्थितीत या उरणच्या पिरवाडी बीचकडे पर्यटकांचा ओढा वाढत असताना इथे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेलला नाही. बीच कडे दुर्लक्ष झालेले आहे. काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. या बाबींकडे जर शासनाने लक्ष केंद्रित करून हा पिरवाडी बीच सुसज्ज बनविला तर आणखी पर्यटकांचा लोंढा वाढून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.