आगामी निवडणुकीसाठी शेकापची नवी खेळी : परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची या सुत्राचा वापर करणार – आमदार बाळाराम पाटील
उरण (दिनेश पवार) : उरण-पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आता परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची या सुत्राचा वापर करण्याची घोषणा आमदार बाळाराम पाटील यांनी उरण येथे आयोजित करण्यात आलेल्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने केली.
शेकाप ७४ वा वर्धापन दिन उरण येथील एसएसपी इंटरनॅशनल स्कूल-फुंडे येथील सभागृहात सोमवारी (२) आयोजित करण्यात आला होता. शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्योजक तथा पनवेल माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, राजिप सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील, काशिनाथ पाटील, राजेश केणी, पनवेल महापालिका विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे, राजिप अध्यक्ष योगिता पारधी, माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ, नारायण घरत, जितेंद्र म्हात्रे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार बाळाराम पाटील यांनी शेकाप पक्ष सोडून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते गेले आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका आणि उरण-पनवेलमधील आगामी येऊ घातलेल्या पालिका, झेडपी आदी निवडणुकीत शेकापला अस्तित्व टिकविणे अवघड होऊन बसले आहे. मात्र त्यानंतरही उरण-पनवेलमधील प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले वातावरण निर्माण केले आहे. तरीही आगामी निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद दूर सारून एकत्रितपणे शेकापची वज्रमूठ तयार करण्याचे आवाहन आमदार बाळाराम पाटील यांनी केले आहे. यासाठी येत्या वर्षभरात परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची या सुत्राचा वापर करण्यात येईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळाबाबत विचार मांडताना महाआघाडीच्या भुमिकेशी शेकाप सहमत आहे. मात्र भावनिक विचार करून दिबांच्या नावासाठी विरोध ना ना बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह अशी सावध भूमिका शेकापने घेतली आहे. तसेच विमानतळाच्या नामकरणाबाबत महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शरद पवार यांनीही आपली भुमिका स्पष्ट केलेली नसल्याचा गौप्यस्फोट आमदार बाळाराम पाटील यांनी केला. विवेक पाटील यांच्या अटकेनंतर विरोधकांनी दुषित वातावरण निर्माण केले. शेकाप समितीतुन बाहेर कसा पडेल यासाठीही विरोधकांनी राजकारण केले. विरोधकांच्या गलिच्छ राजकारणामुळे अखेर समितीमध्ये फुट पडली. विमानतळाच्या नामकरणात रामशेठ यांनी राजकारण आणले. बैठकाही हायजॅक केल्या. यामुळे समितीतुन शेकाप बाहेर पडला असल्याचा आरोपही आमदार बाळाराम पाटील भाषणातून केला.
कर्नाळा बॅंक प्रकरणी विवेक पाटील यांच्या अटकेनंतर विरोधकांनी जोरदार फटाके फोडले. मात्र बॅंकेच्या ठेवीदारांचा एक-एक पैसा परत केला जाईल आणि त्यानंतर आगामी काळात विरोधकांचे फटाके फोडणार असल्याचा दावाही आमदार बाळाराम पाटील यांनी भाषणातून केला. तसेच उरण-पनवेलमध्ये १५ ऑगस्ट पर्यंत शेकापची नवीन कार्यालये उघडण्यात येतील असा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
याप्रसंगी शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, सीमा घरत, राजिप सदस्य राजेंद्र पाटील, मेघनाथ तांडेल यांनीही मनोगत व्यक्त केले.