नवी मुंबई

पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांची फांद्या छाटणी जलद गतीने 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जोरदार वा-यासह मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असून वादळी वा-यामुळे त्या दिवसभरात 122 झाडे, झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. विभाग कार्यालय स्तरावरील मदत पथके तसेच अभियांत्रिकी, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभागाच्या माध्यमातून रहदारीला व वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरिता झाडे, फांद्या हटविण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात आलेली आहे.

या अनुषंगाने पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांच्या फांद्या छाटणे या कामाचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने उद्यान विभागाची बैठक आयोजित करीत सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची उद्यान विभागामार्फत सुरु असलेली छाटणी कामे नियोजिनबध्दरित्या काम करीत, आवश्यकता भासल्यास यंत्रसामुग्री व मनुष्यबळात वाढ करून 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, उद्यान विभाग उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, सहाय्यक आयुक्त श्री. अनंत जाधव आणि उद्यान विभागातील उद्यान अधिकारी, उद्यान अधिक्षक उपस्थित होते.

झाडांच्या फांद्या छाटणी कामांचे विभागनिहाय नियोजन करून दररोज कोणत्या क्षेत्रात, किती काम झाले याचा तपशील नियमित सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी देण्यात येत असलेली विभाग कार्यालय पातळीवरील परवानगी आवश्यक पाहणी करून 24 तासात दिली जावी अशाही सूचना देण्यात आल्या. सद्यस्थितीत विभाग कार्यालय पातळीवर प्रलंबित असलेले सोसायट्यांतील वृक्ष फांद्या छाटणी परवानगी अर्ज 24 तासात निकाली काढण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. कोणत्याही परिस्थितीत वृक्षांच्या फांद्या छाटणीची परवानगी घेऊन संपूर्ण वृक्षच तोडला जाणार नाही याकडे काटेकोर लक्ष ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले.

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रहदारीला अडथळा करणा-या अथवा पथदिव्यांचा प्रकाश रोखणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी उद्यान विभागामार्फत केली जात असून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील वृक्ष फांद्यांची छाटणी केली जात असल्याने त्यासाठी उपलब्ध 6 लॅडर व्हॅनमध्ये वाढ करावी तसेच फांद्यांची छाटणी करणारे मनुष्यबळही आवश्यकता असल्यास वाढवावे असे आयु्क्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे जलद काम व्हावे यादृष्टीने सकाळी 6 वाजता कामास सुरुवात करून संध्याकाळी 7 पर्यंत छाटणी करावी व रोजच्या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा आणि उर्वरित कामाचे नियोजन करावे तसेच दररोजच्या कामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

कामे सुरु असताना त्यावर पर्यवेक्षण हवे तरच कामावर नियंत्रण राहील असे सांगत अशा प्रकारची पर्यवेक्षण व्यवस्था ठेवावी आणि पावसाळापूर्व कामांमध्ये कालावधीच्या डेडलाईनचे महत्व लक्षात घ्यावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. याबाबतच्या कोणत्याही तक्रारीला त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे असे स्पष्ट करीत याकामी अडचण आल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

रस्त्याच्या कडेला पार्कींग करून ठेवलेल्या वाहनांमुळे झाडांच्या फांद्या छाटणीला अडथळे येतात अशा अडचणी उद्यान सहाय्यकांमार्फत यावेळी मांडण्यात आल्या. त्यावर ज्या ठिकाणी अशा वाहनांच्या अडचणी येतात त्या भागात वाहनाजवळ उभे राहून वाहनांमुळे येणारा कामातील अडथळा परिसरातील नागरिकांना ऐकू जातील अशा रितीने हॅंड स्पिकरव्दारे लक्षात आणून देऊन वाहने हटविण्याचे आवाहन करावे व वाहने हटवून घ्यावीत असे आयुक्तांनी सूचित केले.

झाडांच्या फांद्या छाटणी हा पावसाळापूर्व कामांमधील एक महत्वाचा विषय असून सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्परतेने कार्यवाही करावी तसेच सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी अर्ज प्राप्त झाल्यानंतर 24 तासात देण्याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या कामांची कोणत्याही विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून यामध्ये हलगर्जीपणा केलेला चालणार नाही असे स्पष्ट केले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button