तुर्भे विभागात कॉरी क्षेत्रातील कामगारांचे लसीकरण:
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांचे संभाव्य तिस-या लाटेपूर्वी कोव्हीड लसीकरण पूर्ण व्हावे याकरिता नागरिकांना आपल्या घरापासूनच जवळच लसीकरण करता यावे यादृष्टीने लसीकरण केंद्रांच्या संख्येत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येत आहे. आधीच्या 34 लसीकरण केंद्रांमध्ये 17 जूनपासून 22 शाळांमधील लसीकरण केंद्रांची भर घालण्यात आलेली असून उर्वरित शाळांमध्येही येत्या एक ते दोन दिवसात लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
कोव्हीड लस पूर्णत: सुरक्षित असून लसींच्या दोन डोसमधील अंतरही जागतिक स्तरावर प्रमाणित असल्याने 30 वर्षांवरील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या नजिकच्या केंद्रांवर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन विविध माध्यमांतून केले जात आहे. सोशल माध्यमाव्दारे आवाहन करण्याप्रमाणेच ठिकठिकाणी होर्डींगही लावण्यात येत आहेत. याशिवाय वस्त्या, वसाहतींमध्ये नागरी आरोग्य केंद्रे तसेच विभाग कार्यालये यांच्या माध्यमातून माईकव्दारे लसीकरणाबाबत जागृती केली जात आहे. याकामी लोकप्रतिनिधींचाही सहभाग घेतला जात आहे.
लसीकरणापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये कॉरी क्षेत्रात काम करणारे व तेथेच राहणारे कामगार व त्यांचे लसीकरणासाठी प्रमाणित वयातील कुटुंबिय यांच्याही लसीकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष देत तुर्भे विभागात इंदिरानगर परिसरातील डि.वाय.पाटील कॉरी आणि चुनाभट्टी कॉरी परिसरातील 25 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आता त्याच परिसरातील रिकोंडा, चेतक स्टोन, बबनशेट, राजलक्ष्मी, साई स्टोन या कॉरी परिसरातील कामगारांचेही लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
कोव्हीड 19 लसीकरणापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण काळजी घेतली जात असून रस्त्यांवरील बेघर, निराधारांचेही लसीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोव्हीडपासून संरक्षण देणा-या व कोव्हीड विषाणूचा आरोग्यावर होणारा प्रभाव कमी करणा-या लसीचा डोस निश्चित घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे