तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन
भारतीय हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार तौत्के चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसणार असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांच्याशी 14 मे रोजी वेबसंवादाव्दारे बैठक घेत 14 ते 18 मे या कालावधीत दक्ष राहण्याविषयी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नवी मुंबई पोलीस विभागाच्या सहकार्याने विविध विभागांत विशेषत्वाने खाडीकिनारी असलेल्या भागातील मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याच्या व नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
आज दि. 17 मे रोजी पहाटेपासून जोरदार वा-यासह पावसाला सुरुवात झाली असून सकाळी 8.30 वाजेपर्यंत बेलापूर येथे 7.90 मिमी, नेरूळ येथे 9.40 मिमी, वाशी येथे 7.80 मिमी, कोपरखैरणे येथे 15.00 मिमी आणि ऐरोली येथे 7.50 मिमी अशाप्रकारे एकूण 9.52 मिमी पर्जन्यवृष्टीची नोंद झाली.
त्याचप्रमाणे सकाळी 8.30 वाजल्यापासून सायं. 6.30 वा.पर्यंत बेलापूर येथे 39.90 मिमी, नेरूळ येथे 44.20 मिमी, वाशी येथे 50.60 मिमी, कोपरखैरणे येथे 70.70 मिमी आणि ऐरोली येथे 76.20 मिमी अशाप्रकारे एकूण 56.32 मिमी पर्जन्यवृष्टीची नोंद झाली.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठी आधीपासूनच पथके तैनात होती. या कालावधीत महापालिका क्षेत्रात 122 छोटी – मोठी झाडे अथवा झाडाच्या मोठ्या फांद्या (बेलापूर – 11, नेरुळ – 28, वाशी – 44, कोपरखैरणे – 18, ऐरोली – 21) पडल्या असून विभाग कार्यालयातील पथकांनी अभियांत्रिकी व अग्निशमन विभागाच्या सहाय्याने रहदारीला व वाहतुकीला पडलेल्या फांद्या / झाडांमुळे अडथळा होणार नाही याची काळजी घेत तत्परतेने झाडे हटविण्याची कार्यवाही केली.
या कालावधीत शॉर्ट सर्कीटच्या 4 घटना तसेच आग लागण्याची 1 घटना घडली असून महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने त्वरीत विमोचन कार्यवाही केलेली आहे. 2 चार चाकी वाहने व एका ऑटोरिक्षावर झाडाच्या फांद्या पडल्याने त्यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 व्यक्ती किरकोळ जखमी झालेले आहेत.
तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशा-यानुसार महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी सतर्कता राखत नागरिकांची कुठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली