उद्या 27 सप्टेंबर रोजी 101 केंद्रांवर 18 वर्षावरील नागरिकांसाठी 40 हजारहून अधिक लसीकरणाचे नियोजन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने सोमवार, दि. 27 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या 101 लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील नागरिकांच्या पहिल्या डोसकरिता 40 हजार लसीकरणाचे नियोजन जाहीर करण्यात आलेले आहे.
आत्तापर्यंत 10 लाख 11 हजार 799 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 4 लाख 87 हजार 321 नागरिकांनी कोव्हीडचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
कोव्हीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी अधिकाधिक नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित व्हावेत हा महानगरपालिकेचा प्रयत्न असून नागरिकांना आपल्या घरापासून जवळ लस घेणे सोयीचे व्हावे व गर्दी विखुरली जावी याकरिता उद्या 27 सप्टेंबरला 101 केंद्रे कार्यान्वित असणार असून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली, तुर्भे रूग्णालये याठिकाणी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. तसेच सेक्टर 5 वाशी येथील इ.एस.आय.एस. रूग्णालयात 4 केंद्रे असलेली व विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे 2 केंद्रे असलेली जम्बो सेंटर्स, 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे, एपीएमसी येथील ग्रोमा सेंटर दाणा मार्केट व भाजी मार्केट, रेल्वे काॅलनी हेल्थ युनीट जुईनगर त्याचप्रमाणे इनॉर्बिट माॅल वाशी व ग्रॅंड सेंट्रल माॅल सीवूड येथील ड्राईव्ह इन लसीकरण याठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण होणार आहे.
यासोबतच बेलापूर विभागात 8, नेरूळ विभागात 12, वाशी विभागात 4, तुर्भे विभागात 7, कोपरखैरणे विभागात 10, घणसोली विभागात 10, ऐरोली विभागात 8 व दिघा विभागात 3 अशी 62 वेगळी केंद्रे शाळा, समाजमंदिर, सांस्कृतिक भवन अशा ठिकाणी कार्यान्वित असणार आहेत.
याशिवाय सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता कोव्हिशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी 9 ते 5 या वेळेत विशेष केंद्रावर उपलब्ध असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने लस उपलब्धतेनुसार दररोज 50 हजारपेक्षा अधिक लसीकरणासाठी 110 केंद्रांचे नियोजन केलेले आहे तरी नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यंत सुरक्षित असलेली कोव्हीड लस घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.