तिसरी लाट लांबविण्यासाठी कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आवाहन
निर्बंधातील सवलतींमुळे रुग्णवाढीचा धोका ओळखून नवी मुंबई महानगरपालिका सतर्क
अमेरिका, रशिया, जपान व इतर देशांतील कोरोनाची स्थिती पाहता तसेच साधारणत: सप्टेंबर महिन्यात तिस-या लाटेचा धोका जाणवणार असल्याची केंद्रीय निती आयोगाने व्यक्त केलेली शक्यता लक्षात घेता या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने तिस-या लाटेच्या पूर्वतयारी कामांना गती दिलेली आहे.
सध्या दररोजच्या रुग्णसंख्येत घट दिसत असल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आगामी सणांचा कालावधी लक्षात घेता तिसरी लाट येण्याचा धोका दिसत असून या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून आरोग्य सुविधांमध्ये करावयाच्या आवश्यक वाढीचा नियमित आढावा घेतला जात आहे. सध्या निर्बंध हटविण्यात आल्याने रुग्णवाढीची भीती लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले आहेत.
सध्या कोरोना बाधीतांची संख्या दररोज 50 च्या आसपास आलेली असली तरी दैनंदिन व्यवहारावरील निर्बंधांतील शिथीलतेमुळे ती वाढू नये याकरिता सतर्कतेने पावले उचलली जात आहेत. याकरिता मास्क, सुरक्षित अंतर या कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असून त्यांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे कोरोना बाधीताच्या संपर्कातील व इमारतीमधील सर्व नागरिकांची कोव्हीड टेस्ट करण्यात येत आहे.
अशाप्रकारे कोव्हीडच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात असून जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सध्या कोरोना बाधीतांची संख्या कमी असूनही दैनंदिन 6 हजारहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत.
त्याचप्रमाणे लसींच्या उपलब्धतेनुसार अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होऊन ते संरक्षित व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दररोज संध्याकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि विभाग अधिकारी यांच्याशी वेबसंवादाव्दारे होणा-या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांकडून या सर्व गोष्टींचा आढावा अत्यंत बारकाईने घेतला जात असून त्यानुसार कोव्हीडची तिसरी लाट लांबविण्यासाठी नियोजन केले जात आहे.
संभाव्य तिसरी लाट दुस-या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असेल असे आरोग्य तज्ज्ञांकडून तसेच निती आयोगाकडूनही सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने ऐऱोली व नेरूळ ही दोन्ही रुग्णालये कोव्हीडमध्ये रुपांतरीत करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. याठिकाणी प्रत्येकी 200 बेड्स पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. तिस-या लाटेमध्ये मुले बाधीत होण्याचे प्रमाण अधिक असेल या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नेरुळ व ऐरोली या दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी 80 बेड्सचे स्वतंत्र पिडीयाट्रीक वॉर्ड्सचे नियोजन करण्यात आलेले आहे. या वॉड्सची रंगसंगती, तेथील व्यवस्था ही मुलांच्या मानसिकतेला साजेशी असावी याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी आढावा बैठकीप्रसंगी दिले.
त्याचप्रमाणे या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येक 50 बेड्सचे प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात कोव्हीड वॉर्डचे नियोजन व्यवस्थितरित्या करावे असेही आयुक्तांनी सूचित केले. या दोन्ही रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन पाईपलाईन, इलेक्ट्रीकल काम पूर्ण करून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत वापरात यावेत याकरिता दिवसरात्र काम करावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
यासोबतच मयुरेश चेंबर्स येथील 485 ऑक्सिजन बेड्स व पोळ फाऊंडेशन येथील 550 ऑक्सिजन बेड्स या डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मधील कामही तत्परतेने कऱण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच काही ठिकाणी निर्माण करण्यात येणा-या नियोजित कोव्हीड केअर सेंटर सुविधांच्या निर्मितीसाठी तयार रहावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत जाणवलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता लक्षात घेऊन ऑक्सिजनसारख्या अतिशय महत्वाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 20 टन क्षमतेचा ऑक्सिजन टॅँक आलेला असून आणखी 2 टॅंक 30 ऑगस्टपर्यंत येतील. टँक आल्यानंतर टँक बसविण्याचे बांधकाम सुरु करण्याऐवजी येणा-या टँकचे डिझाईन घेऊन आत्तापासूनच बांधकामे सुरु करावीत म्हणजे वेळेची बचत होईल व टँक लवकर वापरात येतील असे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय 10 सप्टेंबरपर्यंत आणखी एक 20 टन क्षमतेचा टँक उपलब्ध करून घेऊन एकूण 80 टन ऑक्सिजन टँक क्षमता पूर्ण करून घेण्यास सर्वाधिक प्राधान्य द्यावे, त्याचप्रमाणे आणखी 15 टन क्षमतेच्या टँकची प्रक्रियाही लवकरात लवकर करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. महानगरपालिकेचे एकूण 93 टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँक्सचे नियोजन असून त्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
कोव्हीड रुग्णालयांकरिता आवश्यक असलेली उपकरणे महानगरपालिकेने उपलब्ध करून घेतलेली असून त्यांची गुणवत्ता तपासणी करून घ्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे रुग्णालयांसाठी आवश्यक आयसीयू बेड्सही जलद उपलब्ध करून घेण्याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवावा असेही निर्देशित करण्यात आले.
नेरुळ रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता प्रतिदिन 5 हजारपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले असून ती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होईल यादृष्टीने कार्यवाहीला गती द्यावी व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
कोव्हीडच्या यापूर्वींच्या लाटांपेक्षा तिसरी लाट अधिक धोकादायक असेल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात असून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सतत हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसूत्रीच कोव्हीडच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवणारी आहे. सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी झालेली दिसली तरी आता कोरोना संपला असे न समजता नागरिकांनी कोरोनाचा डेल्टा विषाणू अधिक घातक आहे हे लक्षात घेऊन आपल्या आरोग्याविषयी निष्काळजी न राहता कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करावे व लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.