लेख

माणसाच्या जीवनाचा अमूल्य ठेवा – पुस्तक

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेन मधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेन मध्ये मिगेल डे सर्व्हंटीसच्या व विल्यम शेक्सपिअर आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिस येथे युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर, श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

कॉपीराइट म्हणजे काय ?

कॉपीराइट ही कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधी कधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एक विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशन व्यतिरिक्त अन्य कोणी रचना व साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

दरवर्षी, जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट संकल्पना असते.

पुस्तके आपल्याला ज्ञान देतात यात शंका नाही. परंतु पुस्तकांमध्ये बऱ्याच मनोरंजक गोष्टी देखील वाचायला मिळतात. ती आपले मनोरंजन देखील करतात. आपली भाषा देखील पुस्तकाद्वारे सुधारते.

हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात. तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेन मध्ये दोन दिवस रिडींग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉन अखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हंटीस पुरस्कार दिला जातो. स्वीडन मधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.

पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर :

पुस्तकांसाठी घर बांधणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव महापुरुष आहेत. ज्या ग्रंथांवर बाबासाहेबांनी जीवापाड प्रेम केले, त्यापैकी अत्यंत महत्वाचे व दुर्मिळ असलेले सुमारे ११०० ग्रंथ त्यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयास दिले आहेत. वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तक दिन पोरकाच म्हणावा लागेल. इंटरनेटच्या या युगात वाचन संस्कृतीला आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा संबंध जोडला जातो.
अलीकडे आई वडील आणि मुलं, किंवा विद्यार्थी-शिक्षक हे एकत्रितपणे वाचन करीत बसले आहेत असे चित्र क्वचितच पहावयास मिळत आहे. त्या ऐवजी आता सर्वांच्या हातात स्मार्ट फोन मोबाईल आला आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकरांनी १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केली. महाविद्यालयाच्या उभारणी निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा केव्हा दिल्ली अथवा मुंबईहून औरंगाबादेत येत, तेव्हा सोबत अतिशय मौलिक ग्रंथ आणत असत. तहान भूक विसरून ते ग्रंथांचे वाचन करीत असत.

आजही डॉ बी. आर. आंबेडकरांनी मिलिंद विज्ञान महाविद्यालयास दिलेली राज्यघटना, कायदा, धर्मशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, कुराण, बायबल, विज्ञान, उद्यानशास्त्र तसेच इंग्रजी व मराठी भाषा वांङमयाची दुर्मिळ पुस्तके ग्रंथालयात आहेत. ” दि होली बायबल ” हा ग्रंथ त्यांना कॅलिफोर्निया येथील एस.एन.आय. स्मिथ यांनी १९३६ साली भेट दिला होता. तो ग्रंथ, या शिवाय बायबलचे नवा आणि जुना करार या ग्रंथाचे अनेक भाग, कुराण, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कबीर आदी दुर्मिळ पुस्तके ” ऍज ऑफ नंदाज अँड मौर्याज ” अकबर – दि ग्रेट मोगल याशिवाय ह्यूमन न्यूट्रिशन अँड डाईट अशा अनेक विषयाला स्पर्श करणारे पाहून डॉ बाबासाहेबांची केवढी विद्वता होती हे स्पष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ” दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल ” या पुस्तकाची मुळ प्रत मिलिंद महाविद्यालयात आहे. पुढे याच पुस्तकाचे नाव बाबासाहेबांनी ” बुद्धा अँड हिज धम्म ” असे बदलले. स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून ज्याला संबोधले जाते, त्या हिंदू कोड बिलाची मुळ प्रत देखील या ग्रंथालयात आहे. या प्रतीवर स्वतः डॉ बाबासाहेबांनी पण क्रमांक २५, ३५, ४०, ५२, ५३, ५४ आणि १३४ वर दुरुस्त्या सुचविलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेबांचा जगभर गाजलेला ” दि प्रॉब्लेम ऑफ रुपी – इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन या ग्रंथाची प्रत ही येथे आहे. छोट्याशा डबीत मावेल एवढ्या आकाराचे पवित्र कुराण येथे असून ते ८ से.मी.रुंद व २० फूट लांब आहे.

पुण्यातले फिरते वाचनालय :

पुस्तकांची दुकाने किंवा वाचनालय तर सर्वाना माहित आहेच. पण पुण्यात पुस्तकांचे फिरते वाचनालय बाजीराव रस्त्यावरील सरस्वती विद्या मंदिराच्या समोर १९४८ पासून आठवले कुटुंब जुनी पुस्तके विकत आहेत. त्यांचा संग्रह इतका प्रसिद्ध आहे की लोक स्वतःहून त्यांना शोधत येतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,दिवंगत रां.ची. ढेरे, निरंजन घाटे असे अनेक लेखक मान्यवर त्यांच्या बुक स्टॉलला आवर्जून भेट द्यायचे. याशिवाय भांडारकर इन्स्टिटयूट, भारत इतिहास संशोधन मंडळ अशा अनेक संस्थांचे वाचनालय आठवले कडच्या पुस्तकांनी समृद्ध झाली आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना यंग इंडिया मासिकाचे अंक आठवले यांनी विमानाने दिल्लीला पाठवले आहेत. २०१० साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करणे हा आयुष्यातला त्यांचा सुवर्ण योग्य आहे. अशी पुस्तकांवर प्रेम करणारी मंडळी आहेत.

माणसांचा पुस्तकांचा संबंध हा जन्मा पासून तर मृत्यू पर्यंत असतो. त्याला एकदा लिहिता वाचता आले की, तो पुस्तकाच्या दुनियेत रमून जातो. हल्लीच्या काळी तंत्रज्ञानामुळे फार आमूलाग्र बदल पुस्तकांबाबत झालेले आहेत. तरी सुद्धा पुस्तकांची किंमत माणसाच्या जीवनात कमी झालेली नाही. मानवजातीच्या जीवनातील ही खूप सकारात्मक बाब असून माणसातील जिवंतपणा ठेवण्यास यशश्वी झाली आहे. आजही पुस्तकांची प्रदर्शने मोठ्या प्रमाणात भरली जातात. त्याला भेटी देण्यास गर्दी सुद्धा होते व पुस्तक खरेदीला पण उत्तम प्रतिसाद असतो ही खरोखर चांगला समाज घडविण्याची लक्षणं आहेत. एक पुस्तक हे फक्त एक माणूसच घडवत नाही तर एक समाज काय तर, एक राष्ट्र सुद्धा घडवू शकते.
ज्यांनी ज्यांनी पुस्तकाची कास धरली त्यांनी त्यांनी आपल्या जीवना सोबतच देशात सुद्धा क्रांती घडविली.

जे शिकले, जे साक्षर होते त्यांनीच पुस्तकाचे महत्व सांगितले असे नाही तर संत गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा शिक्षणाला महत्व देऊन दोन बुक शिकण्याचा बहुमूल्य संदेश समाजाला दिला आहे.

पुस्तकाचे माणसाच्या जीवना मध्ये खूप अनन्य साधारण फायदे आहेत जसे की :

१) संवाद कौशल्यात वाढ होते,
२) नवं -नवीन गोष्टी शिकायला मिळतात,
३) बुद्धिमत्तेवर सकारात्मक प्रभाव पडतो,
४) लिहिण्याची क्षमता वाढते,
५) शब्द संपत्ती मध्ये वाढ होते,
६) तुम्ही सहवासातील लोकांवर चांगला प्रभाव टाकू शकता,
७) ताण-तणाव कमी होण्यास मदत होते,
८) रक्त चाप आणि हृदयातील स्पंदनावर नियंत्रण राहते,
९) शांत झोप लागते,
१०) वक्तृत्व कौशल्य वाढते,
११) आत्मविश्वास वाढतो,
१२) न्यूनगंड दूर होते,
१३) विश्लेषक कौशल्य वाढीस लागते,

शेअर ए स्टोरी हा या २०२१ वर्षाची थीम आहे. माणसाच्या जीवनात लहानपणापासून गोष्टीला खूपच महत्व आणि आकर्षण आहे. त्या गोष्टींमधील मनोरंजकता ही फार वेड लावणारी असते. त्या मधली आतुरता व जिज्ञासा कमालीची असते. मुलांना गोष्टींचे फारच आकर्षण असते तर मोठ्यांना सुद्धा गोष्टी ऐकायला खूप आवडतात. लहान मुलांना तर गोष्ट सांगितल्या शिवाय झोपच येत नाही. कल्पना गोष्टींमध्ये सुद्धा माणूस चांगल्या प्रकारे रमतो. ह्या गोष्टी सुद्धा बोध देणाऱ्या असतात.

पुस्तक दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. ह्या वर्षीचा शेअर ए स्टोरी ही थीम अमलात आणूया व वाचाल तर वाचाल ही संस्कृती रुजवू या.

अरविंद सं. मोरे, नवीन पनवेल पूर्व ४१० २०६ मो.9423125251.

Related Articles

Back to top button