तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन:
पनवेल प्रतिनिधी : जो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबासाहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर १६ ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यामध्ये करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ०९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा झाला. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व उपस्थितांनी महापुरुष, हुतात्म्यांना तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून या मोर्चाला सुरुवात केली.
या मशाल मोर्चात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, जे. डी. तांडेल, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाब वझे, सरपंच संतोष घरत, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, २७ गाव समितीचे नंदराज मुंगाजी, दशरथ भगत, मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, अर्जुनबुवा चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, साई संस्थान वहाळचे संस्थापक रवी पाटील, कामगारनेते सुरेश पाटील, राजेश गायकर, सीमा घरत, रुपेश धुमाळ, दीपक म्हात्रे, यांच्यासह कृती समितीच्या विविध शाखांचे पदाधिकारी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहभागी झाले होते.
प्रकल्पग्रस्तांच्या एकतेची ताकद प्रचंड आहे, आणि ती सरकारला कळली सुद्धा आहे, मात्र नामकरणाचा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन त्याचा घाट घालण्याचा प्रयत्न करताना त्याची जाणीव झाली नव्हती. १० जून भव्य मानवी साखळी आणि २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनातून सरकारची भंबेरी उडाली आहे, मात्र झोपेचे सोंग घेत राज्य सरकार कारभार करत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. मात्र खूप झाला अन्याय आता स्वस्थ बसायचं नाही, तर दिबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय माघार घायची नाही, असा गर्भित ईशारा या प्रज्वलित मशालीच्या माध्यमातून देण्यात आला. त्यानुसार विमानतळाचे काम बंद करण्यासाठी सोमवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ०९ वाजता ओवळे फाटा येथे जमणार भूमिपुत्र जमणार आहेत.