ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील रस्त्यांच्या डागडुजीची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
– कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या जीवाला धोका लक्षात घेता येत्या पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा ठेवण्याचे उद्दिष्ट:
– पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा:
ठाणे:
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामे येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व आढावा बैठक आज जिल्ह्याधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी बोलताना त्यांनी हे निर्देश दिले.
त्यासोबतच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाच येणारा मान्सून हा आपल्या सगळ्यांची कसोटी पाहणारा असेल त्यामुळे त्यासाठी सगळ्यांनाच सज्ज रहावे लागणार असल्याच त्यानी स्पष्ट केलं. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत त्यातील काही जण अतिदक्षता विभागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात काहीही करून अखंडित वीज पुरवठा चालू राहील आणि वीज नसल्याने कुणाचा जीव जाणार नाही याला प्राधान्य देण्याची गरज असल्याच त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या मान्सूनपूर्व तयारीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. यात प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छता, नालेसफाई, रस्त्यावरची उघडी मेनहोल्स त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी शक्य ते सारे करण्याचे निर्देश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले. त्यासोबतच धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे स्थलांतर, पूरजन्य भागातील बोटीची आवश्यकता, प्रत्येक मनपा अंतर्गत येणार कंट्रोल रूम यांची व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देशही दिले.
पावसाळ्यासोबत येणारे आजार टाळण्यासाठी साथ रोगांची औषधे, बेडस याबाबत वैद्यकीय विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यासोबत लँड स्लाईड, पाणी भरणे, पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी एनडिआरएफची 3 पथके सज्ज ठेवण्याच्या त्यांनी सूचना त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्या.
पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकांचे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवणे. आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य अद्ययावत ठेवणे. जेसीबी, पोकलेन, क्रेन तयार ठेवणे. याशिवाय गोतेखोर गावातील पट्टीचे पोहणारे यांची यादी सज्ज ठेवणे याला प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले. रेल्वेच्या अखत्यारीतील नालेसफाई, रुळांची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यासोबत एमआयडीसी भागातील रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक झाडांची छाटणी, उघड्या विजतारांची दुरुस्ती ताबडतोब करण्याचे आदेश दिले. एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनी त्याची कामे वेळेत करावीत ऐन पावसाळ्यात खड्डे खणून ठेवू नयेत असंही त्यांनी या अधिकाऱ्यांना बजावले.
या बैठकीला पालकमंत्र्यासह ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर आणि एमएमआर रीजन मधील 14 महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस अधिकारी आणि सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.