नवी मुंबई

टेक्नोसॅव्ही कल्पक नवी मुंबईकर नागरिकांकरिता “स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज” स्पर्धेचे आयोजन

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये 10 ते 40 लक्ष लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून बहुमान लाभलेली नवी मुंबई महानगरपालिका ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना राष्ट्रीय मानांकन उंचाविण्यासाठी नागरिकांच्या सहयोगाने सज्ज झालेली आहे.

यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत समृध्द पर्यावरण साकारण्यासाठी ‘स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Swachh Innovative Tenchonolgy challenge)’ घोषित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘नवी मुंबईचे स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Navi Mumbai’s Swachh Innovatiive Tenchonolgy challenge)’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील –
नागरिक, विद्यार्थी, शिक्षण संस्था, विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक समुह, नवे लघुउद्योजक (Start Ups) व तांत्रिक व अतांत्रिक कॉर्पोरेट्स हे आपल्या स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांसह सहभागी होऊ शकतात.

यांना ‘नवी मुंबईचे स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Navi Mumbai’s Swachh Innovatiive Tenchonolgy challenge)’ यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या चॅलेंजनुसार अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणा-या नव्या संकल्पनांची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग समाज, वॉर्ड व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने नजरेसमोर ठेवले आहे. यामधून स्वच्छता विषयक नवनव्या संकल्पनांचा उदय होईल व शहर स्वच्छता कार्याला लोकसहभागातून अधिक गतीमानता लाभेल.

या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडून –
कचरा वर्गीकरण, कचरा संकलन, कच-याची विल्हेवाट, कच-यापासून खतनिर्मिती, शून्य कचरा (कचरा कमी करणे), कच-यावर पुनर्प्रक्रिया, कच-यापासून पुनर्निमिती, प्लास्टिक कच-याचे सुयोग्य व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा, लोकसहभाग वाढीकरिता संकल्पना अशा कचरा व स्वच्छतेशी संबंधित विविध बाबींवरील नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्प सादर केले जाणे अपेक्षित आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागाकरिता नागरिकांनी –
-ऑनलाईन गुगल फॉर्मची लिंक shorturl.at/ijuHO यामध्ये माहिती भरावयाची आहे.
-त्यासोबतच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पाची माहिती अपलोड करावयाची आहे.
-प्रकल्पाला पूरक छायाचित्रे, व्हिडिओ छायाचित्रीकरण, पीपीटी (प्रत्येकी 1 एमबी क्षमतेच्या जास्तीत जास्त 5 फाईल्स मर्यादा ) अर्जासमवेत अपलोड करावयाच्या आहेत.

स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता 15 ते 31 डिसेंबर 2021 हा कालावधी जाहीर करण्यात आलेला आहे.

या चॅलेंजमध्ये सर्वौत्तम तांत्रिक संकल्पना सादर करणा-या पहिल्या 3 क्रमांकाना –
रु. 1 लक्ष,
रु. 50 हजार,
रु. 25 हजार
रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान केली जाणार आहेत. तसेच अंतिम फेरीसाठी निवडल्या जाणा-या स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे.

तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांकरिता आयोजित या चॅलेंजमधील प्रथम 3 क्रमांकाच्या अभिनव तांत्रिक संकल्पना राज्य स्तरावरील चॅलेंजसाठी पाठविण्यात येणार असून राज्य स्तरावरील चॅलेंजमधूनही सर्वोत्तम संकल्पना राष्ट्रीय स्तरावरील चॅलेंजसाठी पाठविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर अंतिम निवड झाल्यास केंद्र सरकारमार्फत प्रकल्प अंमलबजावणीसाठी रू. 25 लक्ष रक्कमेचे सीड फंडींग केले जाणार आहे.

त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, संस्था यांच्याकडून सूचित करण्यात आलेली एखादी नाविन्यपूर्ण संकल्पना राष्ट्रीय स्तरावर निवडली जावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून नागरिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या निवडक स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे.

चॅलेंजमध्ये सहभागी प्रकल्पांचे परीक्षण करताना त्यामध्ये –
संकल्पनेची नाविन्यपूर्णता, सद्यस्थितीत सुरू असलेल्या कार्यवाहीमध्ये संकल्पना राबविल्यास अपेक्षित सकारात्मक बदल, संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची क्षमता, संकल्पना राबविण्यासाठी व्यावहारिक मूल्यांकन, संकल्पनेचे उपयोगिता मूल्यांकन, संकल्पना राबवावयाची झाल्यास त्यासाठी लागणा-या साहित्याची उपलब्धता व संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा कालावधी अशा विविध बाबींचा गुणात्मक विचार करण्यात येणार आहे.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ च्या अनुषंगाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात असताना संपूर्ण देश पातळीवर विविध शहरांप्रमाणेच आपल्या नवी मुंबईतही ‘नवी मुंबईचे स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Navi Mumbai’s Swachh Innovatiive Tenchonolgy challenge)’ ही अभिनव स्पर्धा आयोजित केली जात आहे. नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांनी नेहमीच सक्रीय सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात असलेल्या स्वच्छता कार्यातील सुधारणांविषयीच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि त्यामधून नवी मुंबई शहर स्वच्छतेला गतीमानता लाभावी हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या अभिनव चॅलेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button