टारगेटेड टेस्टींगवर भर – ओमकार अपार्टमेंट मध्ये कोरोना चाचणी शिबीर संपन्न:
अमेरिका, रशिया, जपान व इतर देशांतील कोरोनाची स्थिती पाहता तसेच साधारणत: सप्टेंबर महिन्यात तिस-या लाटेचा धोका जाणवणार असल्याची केंद्रीय निती आयोगाने व्यक्त केलेली शक्यता लक्षात घेता या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने तिस-या लाटेच्या पूर्वतयारी कामांना गती दिलेली आहे.
सध्या दररोजच्या रुग्णसंख्येत घट दिसत असल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आगामी सणांचा कालावधी लक्षात घेता तिसरी लाट येण्याचा धोका दिसत असून या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून आरोग्य सुविधांमध्ये करावयाच्या आवश्यक वाढीचा नियमित आढावा घेतला जात आहे.
सध्या कोरोना बाधीतांची संख्या दररोज 50 च्या आसपास आलेली असली तरी दैनंदिन व्यवहारावरील निर्बंधांतील शिथीलतेमुळे ती वाढू नये याकरिता सतर्कतेने पावले उचलली जात आहेत. याकरिता मास्क, सुरक्षित अंतर या कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असून त्यांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे कोरोना बाधीताच्या संपर्कातील व इमारतीमधील सर्व नागरिकांची कोव्हीड टेस्ट करण्यात येत आहे. अशाप्रकारे कोव्हीडच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात असून जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सध्या कोरोना बाधीतांची संख्या कमी असूनही दैनंदिन 6 हजारहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत.
आज ओमकार अपार्टमेंट, सेक्टर १५, वाशी मध्ये अशाच टारगेटेड टेस्टींग करण्यात आल्या. सोसायटीचे अध्यक्ष प्रताप भालेराव व सचिव वसंत जोशी ह्यांनी स्वतः कोरोना टेस्ट करून घेतल्या. तसेच सोसायटी मधील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.