टारगेट ओरिएन्टेड वर्कला प्राधान्य देण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश , नोटिशीला प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांवरील पुढील कायदेशीर कारवाईला होणार सुरूवात
संपूर्ण क्षमतेने काम केले तर सरासरी वसूलीच्या दीडपट अधिक वसूली शक्य होऊ शकेल त्यामुळे तसे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून मालमत्ताकर विभागाने थकबाकी वसूलीसाठी प्रत्येक पातळीवर कामाची गती वाढविण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. मालमत्ताकर विभागाच्या मुख्यालय पातळीवरील अधिका-यांच्या विशेष बैठकीप्रसंगी त्यांनी मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि इतर अधिका-यांना टारगेट ओरिएन्टेड वर्क करण्याच्या सूचना केल्या.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून त्यातूनच विविध नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध होतो त्यामुळे त्याकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे असल्यानेच नियमित आढावा घेत असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी नोटीसा बजावूनही त्याला प्रतिसाद न देणा-या 161 थकबाकीदारांवर करण्यात येणा-या पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली व त्यामध्ये सुधारणा सूचविल्या.
50 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे 568 थकबाकीदार असून 161 मालमत्तांची अटकावणी (Attachment) केलेली आहे. इतर काहींमध्ये दुबार देयके, देयकांमधील दुरूस्त्या अशा अडचणी आहेत. याबाबत विविध अधिका-यांची एक समिती तयार करून त्या समितीच्या माध्यमातून दुबार देयकांबाबत तसेच दुरूस्तीबाबतची कार्यवाही केली जावी, जेणेकरून कालबध्द पध्दतीने व पारदर्शकतेने कार्यवाही होऊ शकेल अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
आत्तापर्यंत अटकावणी केलेल्या 161 मालमत्तांची जप्ती / लिलाव यांची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले व इतर मालमत्तांबाबत जप्ती/ अटकावणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
जप्ती / लिलाव या प्रकारची कारवाई थकबाकीदार खातेदारांपैकी फक्त मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांविरूध्दच केली जात असून जर अशा थकबाकीदार खातेदारांना सदर कारवाई टाळण्यासाठी थकीत कर भरण्याची इच्छा असेल तर ती प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना आणि संपूर्णत: पारदर्शक पध्दतीने पूर्ण करण्याबाबत आयुक्तांनी आग्रही भूमिका मांडली.
सन 2020-21 चे आर्थिक वर्ष कोरोना प्रभावित होते. मात्र त्याआधीच्या 2019-20 मधील मालमत्ताकर वसूली लक्षात घेऊन त्यापेक्षा अधिक वसूलीचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवावे व त्यातही थकबाकीदारांच्या वसूलीकडे विशेष लक्ष द्यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. सन 2019-20 मध्ये 12 ऑगस्टपर्यंत 178 कोटी मालमत्ताकराची वसूली झाली होती. ती यावर्षी 2021-22 मध्ये 12 ऑगस्टपर्यंत 180 कोटी इतकी झाली असून यामुळे समाधान न मानता यापुढील काळात ही गतिमानता अधिक वाढविणारी कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
मालमत्ताकर थकबाकी वसूलीमध्ये विभाग क्षेत्रातील अधिका-यांपेक्षा महत्वाची भूमिका मुख्यालय स्तरावरील अधिका-यांची असून कालबध्द उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. दुबार देयकांबाबत तसेच देयकांतील दुरूस्त्यांबाबत प्रमाण कार्यप्रणाली (SOP) निश्चित करून त्यानुसार तत्पपतेने कार्यवाही सुरू करा असे निर्देश देत अटकावणी/लिलाव बाबतची प्रक्रिया निश्चित करून लगेच कार्यवाही सुरू करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. मोबाईल टॉवरची थकबाकी या विषयावर सविस्तर आढावा घेऊन आठवड्याभरात कार्यवाहीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.*
झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट या तत्वानेच संपूर्ण कर रक्कमेची वसूली व्हावी या दिशेने विभागाने मार्गाक्रमण करणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी सांगितले व त्याविषयी गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले.
नियमित मालमत्ताकर भरणा-या ग्राहकांना आवाहन करतानाच थकबाकीदार मालमत्ताधारकांकडेही लक्ष केंद्रीत करून पुढील सात महिन्यांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कामाचे कालबध्द टप्पे तयार करा आणि प्रत्येक टप्प्यावर केलेल्या कामाचा आढावा घेत पुढील उद्दिष्ट निश्चित करून काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. प्रत्येक टप्प्यावर कामाची गती वाढविली तर उद्दिष्टपूर्ती सोपी होईल असेही त्यांनी सांगितले.
मालमत्ताकर विभाग हा महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाचा विभाग असून आपल्या विभागाचे महत्व ओळखून निश्चित केलेले उद्दिष्ट कायम नजरेसमोर ठेवून क्षमता वाढवून काम करावे असे निर्देशित करीत मुख्यालय स्तरावरील अधिका-यांनी क्षेत्रीय अधिका-यांना प्रोत्साहित करून कामाची गती वाढवावी अशा सूचना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केल्या व मुख्यालय पातळीवरील कार्यवाहीचा दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.