रस्त्यावरील बेघर निराधार व्यक्तींचे कोव्हीड लसीकरण करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका
कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असताना लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून वृध्दाश्रम, अनाथाश्रमात असलेले बेडवरील रूग्ण, वृध्द तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे डोक्यावर कोणत्याही प्रकारचे छप्पर अथवा निवारा नसणा-या रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणा-या बेघर निराधार व्यक्ती. असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील दहा दिवसात महानगरपालिकेच्या आठही विभागांत निराधार बेघरांसाठी कोव्हीड लसीकरणाची ही विशेष मोहीम राबविली जाणार असून आज बेलापूर विभागापासून लसीकरणास सुरूवात करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.
समाजविकास व आरोग्य विभागामार्फत आयुक्तांच्या निर्देशानुसार मागील 15 दिवसांपासून या मोहिमेच्या नियोजनाचे काम सुरू करण्यात आले असून समाजविकास विभागातील समुह संघटकांमार्फत प्रत्येक विभागातील 8 ते 10 ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणांवर जाऊन लसीकरण करण्यासाठी डॉक्टर व नर्सेससह विशेष आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले असून सदर पथक निश्चित केलेल्या ठिकाणांवर रूग्णवाहिकेतून जाऊन समुह संघटकांनी त्याठिकाणी एकत्र केलेल्या निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरण करीत आहे.
अशा बेघर निराधारांकडे कोणताही कागदपत्रांचा पुरावा नसल्याने मशीनव्दारे अशा व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर एन्ट्री करण्यात येत आहे. हे बोटांचे ठसे त्यांच्या दुस-या डोसवेळी ओळख पटविण्यासाठी महत्वाचे असणार आहेत.
लसीकरणासाठी आणलेल्या बेघर निराधार व्यक्तीसाठी लसीकरणाची रूग्णवाहिका उभी असेल त्याठिकाणी प्रथमत: हात धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांच्याकरिता चहा, बिस्कीट व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर मशीनवर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर रितसर नोंदणी करून त्यांचे लसीकरण केले जात आहे व त्यांना 30 मिनीटे निरीक्षणासाठी थांबविण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांना मास्कचा वापर करणे आणि इतर कोव्हीड सुरक्षा नियम पालनाविषयी माहिती दिली जात असून त्याचे पालन करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज बेलापूर विभागात विविध 19 ठिकाणी 103 निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरणाविषयी समुपदेशन करण्यात आले असून त्यामधील 14 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
रेल्वे स्टेशन्स, उड्डाणपुलाखालील जागा, धार्मिक स्थळांबाहेरील जागा अशा बेघर निराधार व्यक्ती आढळणा-या प्रत्येक विभागातील जागांचा समुह संघटकांमार्फत शोध घेण्यात आला असून त्याठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. या मोहीमेकरिता संकलित माहितीचा उपयोग समाजविकास विभागास यापुढील काळात लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी होणार आहे.
नवी मुंबईतील कोणताही घटक कोव्हीड लसीकरणापासून वंचीत राहू नये याची महानगरपालिकेच्या वतीने काळजी घेण्यात येत असून प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार आज बेलापूर विभागापासून निराधार बेघर व्यक्तींच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आलेली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड लस ही पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी आपल्याला आज उपलब्ध असलेली लस लगेच घेऊन स्वत:ला संरक्षित करून घ्यावे असे आवाहन केले आहे