पोट भरण्यासाठी किमान दोन तास धंदा करू द्या !
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड) पोट भरण्यासाठी किमान दोनच तास रस्त्यावर फेरीचा व्यवसाय धंदा करू द्या अशी विनवणी करण्यासाठी वाशी सेक्टर 10 येथील फेरीवाले बांधव यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात वाशी सेक्टर दहा येथील अनेक फेरीवाले बांधव सहभागी झाले होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शंभर टक्के फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद होता. म्हणून फेरीवाल्यांचे खाण्या-पाण्यावाचून अतोनात हाल झाले आहेत. आता कुठे कोरोना महामारीने थोडी उसंत दिली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यात मार्केटही सुरळीत सुरू झाले आहे. असे असताना फेरीवाल्यांना मात्र धंदा करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याचे कारण देत महापालिकेने फेरीवाल्यांना रस्त्यांवर धंदा करण्यास मज्जाव केला आहे. तेही फेरीवाल्यांनी मान्य करून आपले धंदे बंद ठेवले आहेत. हे फेरीवाले प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना व कुटुंबाचे पालनपोषण या फेरीचा व्यवसाय करून करत असताना महिनो-महिने यांना व्यवसायच करू दिला नाही तर यांनी आपल्या कुटुंबाला जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न फेरीवाला बांधवांसमोर उभा ठाकला आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी सर्व फेरीवाल्यांनी कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. फेरीवाल्यां बांधवांच्या विनंती नुसार प्रदीप बी. वाघमारे यांनी निवेदनासह नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांची भेट घेऊन चर्चा केली व फेरीवाल्यांना सायंकाळी किमान दोन तास फेरीचा व्यवसाय करू द्यावा अशी कळकळीची विनंती केली.
यावर आयुक्त अभिजित बांगर यांनी आपल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून मार्ग काढु असे आश्वासन दिले. यावेळी शिष्ट मंडळात सुनील गुप्ता, शिवा बेनबन्सी, सोनू खान, मुल्लाजी आणि इतर फेरीवाले उपस्थित झाले होते.