विशेष शिबिरात 158 नागरिकांना कल्याणकारी योजनांच्या लाभाकरिता आवश्यक शासकीय दाखले वितरण
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अनाथ मुले तसेच दिव्यांग व्यक्ती यांचेकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्याचप्रमाणे शासनामार्फतही अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याकरिता विविध दाखले, प्रमाणपत्रे यांची आवश्यकता भासते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यसाठी आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे मिळविणे सुलभ व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या सहयोगाने विविध शासकीय दाखले वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजित या विविध दाखले वितरण शिबिरात सर्व कागदपत्रांचे पुरावे सादर केलेल्या 152 नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे यांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये 25 रहिवासी दाखले, 32 वय अधिवास दाखले (DOMICILE CERTIFICATE), 73 उत्पन्न दाखले तसेच 28 ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे त्याच ठिकाणी वितरित करण्यात आली.
यापूर्वीही 15 सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामधघ्ये 66 नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे यांचे वितरण करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन शासकीय दाखले, प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केल्याबद्दल लाभार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.