श्री. मिलिंद भाऊ म्हात्रे या ग्रामीण भागातील तरुणाचा मराठी चित्रपट “अविरत” होणार ६ मे ला प्रदर्शित
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
ध्येयवेड्या श्री. मिलिंद भाऊ म्हात्रे या ग्रामीण भागातील तरुणाने आपल्याच कथेतून तयार केला ‘अविरत’ मराठी चित्रपट. 6 मे 2022 पासून होणार प्रदर्शित, उरणच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश
उरण दि. 30 (विठ्ठल ममताबादे) माणसाने नेहमी ध्येयवादी असावे याचा प्रत्यक्ष अनुभव रायगड मधील उरण तालुक्यातील कोंढरी करंजा गावातील एका ध्येयवेड्या अशा तरुणाकडून अर्थात मिलिंद भाऊ म्हात्रे यांच्या कडून आला. त्यांच्या मनात कुठेतरी आपण काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. आणि त्यांनी आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेला न्याय देत चिञपटाचे लेखन करण्यास सुरुवात केली.
समाजात एक सामाजिक संदेश, धार्मिक आणि संस्कारक्षम जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या चिञपटाचे लेखन करण्यात आले. परंतु आपण काही व्यावसायिक चित्रपट लेखक नाही त्यामुळे कुणीही निर्माता आपला चित्रपट तयार करतील का? असे वाटत असताना मनाचा निग्रह व अगम्य इछ्चाशक्तीच्या जोरावर राजेश पवार सोलापूर यांच्या मदतीने स्वतः लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार अशी भूमिका पार पाडत “अविरत” या चित्रपटाचे शिवधनुष्य लीलया पेलून हा सिनेमा येत्या 6 मे रोजी आपल्या जवळच्या चिञपटगृहात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ठराविक कलाकार सोडले तर मिलिंदजी म्हाञे यांनी आपल्या जय हनुमान कला मंचच्या बाल कलाकार व कलाकार यांना संधी दिलीय.
कुठलाही पुढचा मागचा विचार न करता चित्रपट काढणे व गावच्या कलाकारांना संधी देणे या सारखा मोठेपणा असूच शकत नाही.तसेच कोंढरी करंजा गावचे आराध्य दैवत श्री. हनुमान देव आणि त्यांच्या आशिर्वादाने आजपर्यंत प्रवास यशस्वी झाला. त्याचमंदीरात मिलिंदजी म्हाञे आणि जय हनुमान कलामंचने ह्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन केले. गेली पंधरा वर्षे अविरत मेहनत घेणाऱ्या मिलिंद म्हात्रे व जय हनुमान कलामंच यांचा अविरत चिञपट नजीकच्या चिञपटगृहात 6 मे पासून झळकत आहे. ग्रामीण भागातील एक ध्येयवेडा कलाकार व त्यांच्या जय हनुमान कला मंचला यश मिळविण्यासाठी रसिक माय-बापांनी हा चित्रपट नजिकच्या चिञपटगृहात आपल्या कुटुंबासोबत पहावा असे आवाहन अविरतच्या पूर्ण टीम कडून करण्यात येत आहे.
सदर चित्रपटात बालवयातील एका गरीब व एका श्रीमंत मुलांची कहाणी असून श्रीमंत मुलगा आपल्या मैत्रीपोटी गरीब मुलात राहून संस्कारमय समाज जीवनाचे दर्शन आपल्या कुटुंबाला कसे घडवितो हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच यातील सुंदर गीते ही झी वाहिनीच्या माध्यमातून प्रदर्शित झाली असून ट्रेलर व टीजर ही प्रदर्शित झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रमोशन देखील करण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्याच मनपसंतीस पडणारा हा चित्रपट आवर्जून पहावा. असे आवाहन करण्यात येत आहे.