शेव्याचा स्वयंभू शंकर मंदिर
उरण (दिनेश पवार) : उरण तालुक्यात जेएनपीटी गेस्ट हाउस समोरील बाजूस ३५० वर्षापूर्वीचे स्वयंभू शंकर मंदिर आहे. उरण शहरापासून सुमारे ११ किलो मिटर अंतरावर असलेल्या गर्द हिरव्यागार झाडीत, शांत वातावरणात हे शंकर मंदिर आहे.
ह्या शंकर मंदिरास शेव्याचा म्हणजेच जेएनपीटी ज्या ठिकाणी आहे तिथे शेवा नावाचे गावं होते. जेएनपीटी आल्याने तेथील गावाचे पुनर्वसन करण्यात आले. मंदिर तिथेच ठेवण्यात आले त्यामुळे या मंदिरास शेव्याचा शंकर मंदिर म्हटले जाते.
या स्वयंभू शंकर मंदिरात हेमांड पंथी मूर्ती आहेत, त्यात गणपती, पार्वती, नन्दी, हनुमान अशा देवतांच्या मूर्ती आहेत. हेमांड पंथी म्हणजे मूर्ती वरच्या बाजूस चपट्या असतात. त्याचप्रमाणे साईबाबा, दत्तात्रेय, वेताळ अश्याही मुर्त्या आहेत. येथे पुरातन उंबराचे झाड आहे. मंदिराच्या आवारात बेल पानाची ५ झाडे आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस भव्य दिपमाळ आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक शिला आहे त्या ठिकाणी भक्तांनी मनोभावे आपली इच्छा सांगितली की ती इच्छा पूर्ण होते असे भक्तगण सांगतात.
मंदिराचे पुजारी संतोष शिवराम दर्णे, त्यांचे वडील शिवराम दर्णे, वामन दर्णे, मसनाजी दर्णे, पुतलाजी दर्णे, जगू दर्णे अशी आमची आठवी पिढी आहे. आम्ही महादेवाची सेवा करीत आहोत असे मंदिराचे पुजारी संतोष दर्णे यांनी सांगितले.
दर वर्षी महाशिवरात्री, हनुमान जयंती, राम नवमी, त्रिपुरा पौर्णिमा, श्रावण महिन्यातील चार सोमवार या दिवशी मोठ्या उत्सवात साजरे करतात. श्रावणी सोमवार या दिवशी सकाळी आरती, अभिषेक, भजन आदी ठेवण्यात येते. दानशुर लोकांच्या वतीने भक्तासाठी सकाळी साबुदाणा खिचडी, दुपारी महाप्रसादचे आयोजन केले जाते.