नवी मुंबई

योग्य वेळेत कोव्हीड टेस्ट करून योग्य उपचार घेण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आवाहन

कोव्हीडच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर दररोज संध्याकाळी 7 नंतर 3 ते 4 तास सर्व वैद्यकीय अधिका-यांशी तसेच विभागांचे सहाय्यक आयुक्त व कोव्हीडशी संबंधीत अधिका-यांशी नियमित संवाद साधत आहेत. नवी मुंबईतील कोव्हीडच्या परिस्थितीचा आढावा घेत असताना दररोज होणा-या कोरोना बाधीतांच्या मृत्यूच्या कारणांवरही चर्चा केली जात असून त्यामध्ये 50 वर्षावरील नागरिकांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे जाणवली तरी कोव्हीड टेस्ट करून न घेता अंगावरच आजार काढण्याचे व नजीकच्या खाजगी क्लिनिकमधल्या डॉक्टरकडून औषध घेऊन घरीच उपचार करून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर लक्षणांची तीव्रता वाढल्यावर कोरोनाची टेस्ट करून घेईपर्यंत रुग्णाची आरोग्य स्थिती अत्यंत खालावलेली असल्याने त्यांना थेट व्हेन्टिलेटर्ससह आयसीयू बेड्सचीच गरज भासत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे अशा गुंतागुंतीच्या आरोग्य स्थितीतून रुग्णाला बाहेर काढणे हे डॉक्टरांनाही अतिशय जिकरीचे होत आहे. उशीरा निदान होणे व गंभीर स्थितीत रुग्ण उपचारासाठी येणे ही बाब रुग्ण सुधारणेच्या दृष्टीने अत्यंत कठीण असल्याचे लक्षात घेत आयुक्तांनी 50 वर्षावरील कोरोना बाधीतांना महानगरपालिकेच्या कोव्हीड केंद्रात अथवा त्यांच्या मागणीनुसार खाजगी रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे असे निर्देश सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत. तरीही एखादा रुग्ण गृह विलगीकरणात राहू इच्छित असेल तर ज्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाच्या मार्गदर्शनानुसार व निरीक्षणाकाली सदर रूग्ण गृह विलगीकरणात राहील त्या डॉक्टरचे तसे प्रमाणपत्र घ्यावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले आहे.

मात्र अशा गृह विलगीकरणात असणा-या विशेषत्वाने 50 वर्षाहून अधिक वयाच्या कोरोना बाधीत रुग्णांना महानगरपालिकेच्या कॉल सेंटर मधून ज्याप्रमाणे आरोग्‌यस्थिती जाणून घेण्यासाठी ज्याप्रमाणे दूरध्वनी केला जातो तशाच प्रकारे संबंधित नागरी आरोग्य केंद्रामधूनही दररोज एक दूरध्वनी करण्यात यावा असेही निर्देश वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे गृह विलगीकरणात असणा-या रुग्णांच्या घरी औषधांचा पुरवठाही वेळेत होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

सध्याचे कोरोना बाधीतांमधील मृत्यूचे प्रमाण बघता 80 टक्केहून अधिक मृत्यू हे 50 वर्षावरील नागरिकांचे झाले असल्याचे दिसून येत असून त्यामध्ये उशीरा निदान होणे हे महत्वाचे कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित करीत आयुक्तांनी 50 वर्षावरील सर्व कोरोना बाधीतांना रुग्णालयीन कक्षेत आणण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका कोरोना बाधीतांवर त्यांच्या लक्षणांनुसार उपाचर कऱण्यासाठी आवश्यक रुग्णालयीन सुविधा गतीमानतेने उभारण्याकडे विशेष लक्ष देत असून त्याठिकाणी इतर व्यवस्थाही उत्तम दर्जाची असावी याकडे काटेकोर लक्ष देण्यात येत आहे. कोव्हीडच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करावे व कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास कोणत्याही प्रकारे अंगावर आजार न काढता महानगरपालिकेच्या नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रात / रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकतेनुसार कोव्हीड टेस्ट करून घ्यावी. कोरोना वेळेत योग्य उपचार घेतल्याने बरा होतो हे लक्षात घेऊन पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास घाबरून न जाता विशेषत्वाने 50 वर्षावरील नागरिकांनी महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button