रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णाना पुरविण्याची जबाबदारी कोव्हीड रुग्णालयांचीच, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे विशेष आदेश निर्गमित
गंभीर लक्षणे असणा-या कोरोना बाधीतांवरील उपचारांमध्ये लाभदायक ठरणा-या रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा दूर करून त्याची गरज असणा-या रुग्णांना योग्य वेळेत व योग्य दराने त्याचा पुरवठा व्हावा याकरीता संबंधित जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याचे नियोजन महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड रुग्णांवर उपचार करणारी महानगरपालिकेची व खाजगी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर व डेडीकेटड कोव्हीड हॉस्पिटल यांची सूची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रुग्णासाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा हा जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत केला जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर हा राज्य टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याची दक्षता रूग्णालयांनी घ्यावयाची आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असून, कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन मागणीची औषध चिठ्ठी (Prescription) रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये असे महापालिका आयु्क्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड रुग्णालयांना आदेशीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रूग्णालयांवर कारवाई करण्यात येईल असेही सूचित करण्यात आलेले आहे.