वास्तव
घड्याळात सकाळचे ६.३० वाजले असावेत. नामूचे बहुतेक काम उरकले होते. तरवा ढेपून झालाच होता. माचीसची काडी लगबगीने ओढून तरवा पेटवणारच इतक्यात फोन वाजला. काय रं नामू, उठलास की नाय? एका प्रेमळ आवाजात साहेब बोलत होते. हो साहेब, उठलोय. माझं काम पण झालय, मी निघतोच. नामू आदबीन बोलला. हो पण लवकर ये, उगाच ऊशीर नको व्हायला. आम्ही तूझीच वाट बघतोय. एवढे बोलून साहेबांनी फोन ठेवला आणि शेवटी घाई-घाईने माचीसची काडी तरव्याला लावून नामू एकदाचा मोकळा झाला.
तरव्यातून निघणाऱ्या धुरांप्रमाणे नामूच्या मनामध्ये एक ना अनेक विचारांचे धुर काहूर माजले. कालच त्याचा वाढदिवस होता. अनेक कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांतून दिलेल्या शुभेच्छा व साहेबांनी पाठीवर मारलेली शाबासकीची थाप यासारख्या आठवणींने छाती फुगून येत होती. अर्थात या वर्षींच एवढ्या शुभेच्छा ! कारण पूर्वी त्याचा वाढदिवस हा फक्त शाळा सोडल्याच्या दाखल्याला आणि स्व:ता नामू या दोघांनाच माहिती होता. पण आताच्या शुभेच्छा ही सर्व केवळ फेसबुकची किमया म्हणायची.
आता सर्व कामे आटपून तो लगबगीने घरी जायाला निघाला. अंगणात आल्यावर ओटीवर तापाने फणफणत पडलेल्या आईच्या विव्हळण्याचा आवाज त्याला स्पष्ट येवू लागला. आई चार दिवसापासून थंडी तापाने कण्हत झोपूनच होती. पण करणार काय ? तीला तापोळ्याला किंवा महाबळेश्वरास एखाद्या दवाखाण्यात न्यायची म्हटले तर कमीत कमी ५००-१००० रुपये तरी हवेत. नाही तसे होते, ३५०-४०० रुपये खिश्यात पण काल आपल्या साहेबांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी बोलावून घेतल्यामुळे काहीतरी खर्च आपणासही करायलाच हवा होता. म्हणून मग जास्त नाही पण थोड्या-पाण्याच्या बाटल्या, थोडे फरसाण असे किरकोळ २५०-३०० रुपयांचे सामान त्याने घेतले होते. आता एवढे मोठे साहेब, तेबी आपल्या वाढदिवसाची दखल घेवून घरी बोलवून केक कापणार म्हणजे एवढा तरी खर्च आपण करायला नको का ?
आईच्या विव्हळण्याने तो भानावर आला. आईचा आवाज आता त्याच्या मनाला टोचत होता. पण साहेबांनी काल दिलेली शाबासकी आणि सकाळी सकाळी त्यांनी आवर्जून केलेला फोन, म्हणजे… म्हणजे… आपल्याला तर आजच्या कार्यक्रमास गेलेच पाहीजे. नामू मनातल्या मनात निश्चयाची गाठ बांधत होता. अन् आता निवडणूकीलाही किती थोडे दिवस राहिले आहेत. गेल्या काही महिन्यापासूनचा जो आपल्या संघटनेमध्ये निर्माण झालेला एकोपा, सुख असो, दु:ख असो, आमचे कार्यकर्ते हे आर्वजून एकमेकांना न चूकता बोलवत होते आणि आम्हीही जातीने तेथे हजर होत होतो. माझे काम तसे फार मोठे नव्हते. साहेबांनीच माझ्यावर सगळ्या पाहूण्यांच्या पाण्याची व्यवस्था, खुर्च्यांची, ताडपत्री अंथरण्याची मोठी जबाबदारी दिली होती. साहेब बी किती बिजी असणार कार्यक्रमात, तेव्हा मलाच सर्व तयारी नको का करायला? असूदे आईला नेईन उद्या दवाखाण्यात, काय होतय अजून एका दिसानी. तसे मी साहेबांच्या माणसाकडे मागीतले आहेत उसने १००० रुपये. देतील ते आज. आईचं बघू उद्याला. असं तो मनातच पुटपुत राहीला.
आता त्यानं वेळ न दवडता अंघोळ करुन कालचाच पोशाख चढवला. फळकुटावरची चुनापुडी व मोबाईल खिशात घालून लगबगीने निघाला. मंडपात आला, आपली ठरलेली ती कामे तो करत होता. इतक्यात साहेब कुणा साहेबांसोबत स्टेजकडे जात होते, हा आपला खंबीर कार्यकर्ता हायह्ण असे त्याची ओळख ते त्या साहेबांना सांगत होते. आता तर नामूचा ऊरच भरुन फूटतोय की काय असे वाटू लागले. डोक्यावरची टोपी सावरत तो ”ये तूक्या, आर पकड की लेका ती साईट-टाईम झालाय. अरं पाहुणे येण्याचे वेळ झालीय. आवरा लवकर अशा फूकाच्या फूश्याऱ्या तो मारत राहीला.
काही वेळेतच सभा सुरु झाली. साहेबांच्या घोषणांवर, कोट्यांवर आणि आश्वासणांवर टाळ्या वाजवून वाजवून अगदी आनंदी आनंद गडे असे वातावरण झाले होते. उरकली एकदाची सभा. साहेब त्यांच्या खास माणसांसोबत निघाले. त्याच्या पाठोपाठ बहूतेक कार्यकर्ते हळू हळू निघून जात होते. जाता जाता मात्र साहेब नामूला आवर्जून म्हणाले, ”सांभाळ हो आता बाकी सगळे आणि संध्याकाळी आपल्या माणसांसोबत नेहमीच्या ढाब्यावर यायला विसरु नकोस. आम्ही होतो पुढे.ह्ण साहेब गाडीत बसताच नामू तुकाला म्हणाला ”बघ बघ तुक्या, जाता जाता पण साहेब माझ्याशी बोलले की नाय.
इतक्यात मोबाईल वाजला, ”अरं कुठं हायस रे नाम्या ? कुठ मातीत बसलायस, इतं तुझी बया अंथरुणावर लोळते आणि तु कुठे मातीत गेलासय…., अरं म्हैस कुठ चुकली ते बघ, अजून घरी आली नाय. नदीवर बघ जरा. बाबा मोठ मोठ्या आवाजातच शिव्यांची लाखोली वाहत होते. हा हा – हो येतो येतो म्हणत त्याने फोन कट केला,
आता मात्र नामू द्विधा मन:स्थितीत होता…..
लेखन – रवि विट्ठल कदम
ravikadamvashi@gmail.com