महाराष्ट्र

रानसई धरण आटले. फक्त २० दिवसांचा पाणीसाठा शिल्लक…. उरणकरांना सिडकोकडून पाण्याची व्यवस्था

उरण (दिनेश पवार)

उरण तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरणाची पातळी अतिशय खालावली असून फक्त २० दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिल्याने चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाण्याची पातळी एक मिटरने खालावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ दिवसांचा पाणीसाठा कमी आहे. या खालावलेल्या पातळी एमआयडीसीने आत्ता रोज ६ एमएलडी पाणी सिडकोच्या कडून घेण्यास सुरूवात केली आहे.

उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी १९७९ च्या दशकात हे धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्यूबिक मिटर पाणीसाठविण्याची क्षमता आहे. मात्र गेल्या वर्षी पाऊस लवकर गेल्याने धरणाच्या पाणीसाठा कमी झाला. सध्या या धरणात दि. ३ मे अखेर २.८२१ मिलियन क्यूबीक मिटर पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा ३.२४५ एवढा होता. यातील १.५२८ पाणी साठा मृतसाठा (पीण्यास अयोग्य) आहे. सध्या रानसई धरणात पीण्यायोग्य फक्त १.२९३ एमसीएम पाणीच उपलब्ध आहे.

या रानसई धरणातून उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएनजीसी, बीपीसीएल सारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्याप्रमाणात औद्योगीक विकास झाल्याने येथे येणाऱ्या या प्रकल्पांना या धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातून दररोज सुमारे ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

मात्र या वर्षी या धरणातील पाण्याची पातळी चिंताजनक रित्या लवकर कमी झाल्याने एमआयडीसीने उरणला पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोच्या हेटवणे धरणातील पाणी विकत घेण्यास सुरूवात केली आहे. सध्या रोज ६ एमएलडी पाणी सिडकोकडून घेण्यात येत असल्याची माहिती एमआयडीसीचे उप अभियंता आर.डी. बिरंजे यांनी दिली. सिडकोकडून १० एमएलडी पाण्याची मागणी केली होती. मात्र सिडको सध्या रोज ६ एमएलडी पाणी देत असून उरणच्या लोकांची गरज भागविण्यासाठी हे पाणी पुरेसे असून रानसई धरण आणि सिडकोचे पाणी मिश्र करून उरण करांना देण्यात येत आहे. साधारण मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी रानसई धरणात शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उरणच्या नागरीकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन केले आहे. तसेच सिडकोकडून आणखी जास्त पाण्याची मागणी करून उरणकरांची तहान भागवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button