देश

“सार्वजनिक-खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे देशाच्या सागरी क्षेत्राच्या विकासास मिळणार गती” – श्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्री

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

13 नोव्हेंबर 2021: केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज देशातील प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे भेट दिली. आपल्या भेटीदरम्यान श्री सोनोवाल यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची तसेच बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती घेतली. तसेच सार्वजनिक-खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे जेएनपीटी बंदराने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व जेएनपीटीच्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधला.

आपल्या भेटीदरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे देशाच्या प्रगतीमध्ये कसे परिवर्तन होवू शकते आणि देशाचा विकास कसा गतिमान होवू शकतो याविषयी माहिती दिली. जगातील बहुतेक सर्व व्यापार हा समुद्रमार्गे होतो व बंदरे ही संपूर्ण उपखंडातील व देशांतर्गत वाहतूक नेटवर्क (म्हणजे रस्ते, रेल्वे, अंतर्देशीय जलमार्ग) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. म्हणून, जेएनपीटी मधील सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे एक सशक्त व प्रभावी सागरी वाहतूक पायाभूत सुविधा विकसित होण्यास मदत होईल जी देशाच्या आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा घटक असेल. जेएनपीटी मधील सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे बंदराच्या कामकाजाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्याबरोबरच बंदरामध्ये नवीन पायाभूत सुविधा विकसित होतील. 

श्री सोनोवाल यांनी जेएनपीटीने केलेल्या आयात-निर्यात व्यापार केंद्रित उपाययोजना व सुलभ दळणवळणासाठी केलेल्या जागतिक दर्जाच्या सोयीसुविधां देशातील बंदर आधारित औद्योगिक विकासासाठी कशाप्रकारे दिशादर्शक ठरल्या आहेत व त्यामुळे जेएनपीटी हे कशाप्रकारे व्यापार वर्गाचे पहिल्या पसंतीचे बंदर बनले आहे याचा विशेष उल्लेख केला. श्री सर्बानंद सोनोवाल पुढे म्हणाले “मला विश्वास आहे की जेएनपीटी आपल्या कामकाजामध्ये सातत्यपूर्ण तांत्रिक प्रगती आणि बहुविध पायाभूत सुविधां विकसित करुन देशाच्या बंदर आधारित औद्योगिक विकासाचे नेतृत्व करेल व 2030 पर्यंत एक मेगा पोर्ट म्हणून विकसित होईल”.

केंद्रीय मंत्र्याच्या दौ-या विषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “माननीय मंत्री महोदयांचे आज जेएनपीटीमध्ये आगमन झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. यामुळे बंदराची आजवरची उपलब्धी व प्रगती माननीय मंत्री महोदयां समोर सादर करण्याची आम्हाला  संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर आमच्या भागधारकांना देशाच्या वाढत्या सागरी क्षेत्राविषयीचा मंत्री महोदयांशी थेट संवाद साधण्याची व मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली बंदर आधारित सागरी धोरणे देशातील सागरी उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी कशा प्रकारे हातभार लावू शकतात याविषयी चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली. जेएनपीटी हे देशाच्या सागरी क्षेत्रासाठी प्रमुख प्रेरक राहिला आहे; मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने, भारताच्या निर्यात क्षमतेचा आणि सागरी अर्थव्यवस्थेचा फायदा घेऊन आम्ही निश्चितपणे आम्ही आमच्या विकासाचा आलेख चढ़ताच ठेवू.”

जेएनपीटीने नुकतीच सुरू केलेली ‘ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा, वाढवण बंदराची सद्यस्थिती तसेच जेएनपीटीच्या इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसह ‘व्यवसाय सुलभीकरणासाठी’ जेएनपीटीने  हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती जेएनपीटीच्या अधिकार्‍यांनी मंत्री महोदयांना दिली.

जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. व उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत केले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.

आपल्या दिवसभराच्या दौ-या दरम्यान श्री सर्बानंद सोनोवाल यांनी करल जंक्शन येथे जेएनपीटी पोर्ट रोड कॉंक्रिटीकरण प्रकल्पाचे ‘भूमिपूजन’ केले आणि जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझातील अत्याधुनिक सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कमांड सेंटरला भेट दिली. याशिवाय, त्यांनी सागरी पुरवठा साखळीतील अविभाज्य भाग असलेल्या कंटेनर ट्रक चालकांशीही संवाद साधला. श्री सोनोवाल यांनी जीटीआय हाऊसमधील टर्मिनल कामकाजाचा  आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष जहाजावर जाऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर जेएनपीटीच्या  बहु-उत्पादन सेझ (SEZ) आणि हिंद टर्मिनल सीएफसला भेट दिली. तसेच, केंद्रीय मंत्र्यांनी बीएमसीटीपीएल ने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा व दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button