नवी मुंबई

पीएसए प्लान्ट आणि एचआरसीटी मशीनचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये पिडीयाट्रिक सुविधांसह आवश्यक वाढ केली जात असून कोरोनाबाधित रुग्णांवर जलद उपचार होण्यासाठी कोव्हीड सेंटरमध्येच एचआरसीटी स्कॅनींग मशीनची व्यवस्था केल्याने उपचार वेळेत होऊन रुग्ण बरा होण्यासाठी याचा फार फायदा होईल असे सांगत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 960 लीटर प्रती मिनिट क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथील कोव्हीड सेंटरमध्ये सीएसआर अंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त एचआरसीटी डायग्नोस्टिक स्कॅनींग मशीनचे लोकार्पण तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील 960 एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (PSA) लोकार्पण याप्रसंगी पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे या दोन्ही उल्लेखनीय प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री महोदयांसमवेत ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, व श्रीम. सुजाता ढोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त कोव्हीड विरोधातील लढ्याच समर्पित भावनेने अथक सेवाकार्य करणा-या डॉक्टरांचा प्रतिकात्मक सन्मान म्हणून सिडको कोव्हीड सेंटरमधील डॉ. शिवानी मिश्रा यांना सन्मानीत करण्यात आले.

कोव्हीड सेंटरमध्येच एचआरसीटी सुविधा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका

देशातील सर्वोत्तम कोव्हीड सेंटरमध्ये गणल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड सेंटर मध्ये कोव्हीडच्या दुस-या लाटेमध्ये दैनंदिन 1100 हून अधिक रूग्ण उपचार घेत होते. त्यापैकी काही रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनींग करण्यासाठी त्यांना वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात न्यावे लागत होते. यामध्ये काही रूग्णांची प्रकृती अधिक खालावत असल्याचे निदर्शनास येत होते.

याकरिता सिडको एक्झिबिशन सेंटर येथेच एचआरसीटी स्कॅनींग मशीन कार्यान्वित करणेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात येत होते. यामध्ये ‘फ्रीडम फॉर यू फाऊंडेशन’ यांनी सहयोगाची भूमिका घेत डाऊ केमिकल्स्‍, बीएएसएफ कंपनी, इवोनिक इंडिया लि. तसेच क्रोडा इंडिया लि. या नामांकित उदयोग समुहांमार्फत सीएसआरचे नियोजन करुन त्या अंतर्गत महानगरपालिकेस एचआरसीटी स्कॅनींग मशीन प्रदान केली. यामुळे सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत रूग्णांसाठी त्याच ठिकाणी एचआरसीटी स्कॅनींग सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचे लवकर निदान होऊन व त्यांच्यावर जलद उपचार झाल्याने रुग्ण् बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होणार आहे. अशाप्रकारे कोव्हीड सेंटरमध्येच एचआरसीटी सुविधा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.

या मशीनव्दारे प्रतिदिन अंदाजे 100 कोव्हीड बाधित रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनींग होईल. त्यामुळे कोव्हीड रुग्णांवर तत्परतेने उपचार करता येणार आहेत. या मशीनमध्ये आवश्यकतेनुसार लहान मुलांचेही एचआरसीटी स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खाजगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये प्रती स्कॅन रु. 4000/- इतका अंदाजे खर्च येतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड बाधित रुग्णांचे एआरसीटी स्कॅनींग विनामूल्य केले जाणार आहे. याकरीता साधारणत: रु. 1 कोटी 85 लक्ष रकमेचा सीएसआर उपलब्ध झाला असून याची क्षमता 32 स्लाईस इतकी आहे. यावेळी सीएसआर मधून निधी उपलब्ध करून देणा-या उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पीएसए प्लान्टव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेची ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल

कोव्हीडच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा प्रकर्षाने जाणवला होता. हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने गतीमान नियोजन केले व 5 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही सुरू केली. यामधील 960 एलपीएम क्षमतेच्या पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची (PSA) वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात उभारणी करण्यात आलेली आहे.

कोव्हिडच्या तिस-या लाटेचा विचार करता साधारणत: 50 मेट्रिक टन इतकी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची ऑक्सिजनची गरज असून त्यादृष्टीने 5 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (PSA) उभारणी तसेच 3 स्टोरेज टँक आणि 350 ड्युरा सिलेंडर, 325 जम्बो सिलेंडर व 200 बी टाईप सिलेंडर उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने साधारणत: 1200 ऑक्सीजन बेड्स व 500 आय.सी.यू. बेड्सची वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामधील हा पहिला ऑक्सिजन प्रकल्प (PSA) वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय येथे उभारण्यात आलेला आहे.

सार्वजनिक रूग्णालय, वाशी हे 300 बेड्स क्षमतेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्वात मोठे रूग्णालय असून तेथील ऑक्सिजन पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन रूग्णालयाच्या आवारातच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रतिदिन 1.84 मेट्रिक टन इतकी या प्रकल्पाची ऑक्सिजन निर्मिती क्षमता असून दिवसाला 200 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर किंवा 10 डयुरा ऑक्सीजन सिलेंडर भरता येतील असे नियोजन आहे. साधारणत: रू. 1 कोटी 50 लक्ष इतका या प्रकल्पाचा खर्च असून या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे वाशी सार्वजनिक रूग्णालयातील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम होणार आहे.

तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीकरीता पीएसए प्लांटची उभारणी करण्याकडे महानगरपालिका काळजीपूर्वक लक्ष देत आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी कोव्हीड सेंटरच्या लगतच एचआरसीटी स्कॅनींग सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याचा अभिनव प्रकल्प राबविल्याबद्दल प्रशंसा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button