महाराष्ट्र

मालमत्ता कर विरुद्ध कॉलनी फोरम

आज दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी कळंबोली कॉलनी येथील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये, कळंबोली कॉलनीतील विविध सामाजिक संस्था आणि सोसायट्यांचे सभासद यांची बैठक आयोजित केली. सदर बैठकीमध्ये जवळ जवळ दोनशे नागरिक उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात करताना कॉलनी फोरमच्या सचिव आणि मराठवाडा मित्र परिवाराचे अध्यक्ष वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर श्री मनोज सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास संशोधक श्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी पनवेल महानगरपालिका परिसरातील कॉलनी फोरमचे अस्तित्व का गरजेचे आहे? याबाबत इतिहासाचे दाखले देऊन, स्वराज्याची भूमिका समजावून सांगून, सविस्तर विवेचन केले. तर सामाजिक आणि राजकीय विषयाची जाण असलेले, श्री उमेश पाटील यांनी मागील पाच वर्षाचा मालमत्ता कर जनतेने भरण्याचे काही एक कारण नाही. जर स्थानिक आमदार स्वतःच्या फायद्यासाठी खारघर टोल नाक्याचा विषय समोर करून पक्ष बदलू शकतात, तर कॉलनीमधील अडीच लाख मालमत्ताधारकवर लावण्यात आलेला जुलमी मालमत्ता कर माफ का करू शकत नाहीत. कॉलनीमधील एकही नागरिक महानगरपालिकेचा बेकायदेशीर मालमत्ता कर भरणारच नाही. सत्ताधाऱ्यांना सर्व कॉलनीतील रहिवाशांना जेलमध्ये टाकायचे असेल तर टाकून द्यावे, असे आव्हान दिले.

कॉलनी फोरमचे कायदा सल्लागार उच्च न्यायालयाचे वकील श्री. समाधान काशीद साहेब यांनी मालमत्ता कराची केस आपण नक्की जिंकू याचा विश्वास दिला.

कामोठा कॉलनी फोरमचे अध्यक्ष श्री मंगेश अढाव यांनी, मागील सहा महिन्यात कामोठा कॉलनी फोरमची स्थापना झाल्यानंतर, विविध नागरी समस्या सोडविण्याचा वेग कसा वाढला हे सांगून, कॉलनी फोरमचे महत्त्व विशद केले.

कॉलनी फोरमच्या संस्थापिका नगरसेविका लीना अर्जून गरड यांनी, सत्ताधाऱ्यांनी लावलेला मालमत्ता कर कसा बेकायदेशीर आहे, कसा दुहेरी आहे, कसा अवाजवी आहे, हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 99, 127, 129A, 130, 131, 150A यांच्या व्याख्या सह सविस्तर विवेचन केले. सत्ताधाऱ्यांनी ठरविले तर ते सभागृहाच्या कोणत्याही मीटिंगमध्ये बेकायदेशीर दुहेरी आणि अवाजवी तसेच पूर्वलक्षी प्रभावाने मागील पाच वर्षाचा आकारला जाणारा मालमत्ता कर कमी करू शकतात हे कायद्याच्या कलमान्वये समजावून सांगितले, परंतु सत्ताधाऱ्यांना ठेकेदारी साठी जनतेकडून जुलमाने मालमत्ता कर वसूल करावयाचा आहे. परंतु न्यायालयाकडून अथवा राज्य सरकार कडून जनतेला नक्कीच न्याय मिळेल याबाबत लीना गरड यांनी सांगितले.

उपस्थित नागरिकांमधून पोपट आवारी, सत्यवान पडळकर, राहुल बुधे, अर्जुन घाटगे, किरण नागरगोजे, प्रकाश चांदिवडे, प्रशांत गायकवाड, शंकर होनमाने इत्यादी नागरिकांनी, कळंबोली, रोडपाली, खिडकपाडा कॉलनी आणि स्टील मार्केट परिसरात, पार्किंगच्या नावाखाली चालणारी अवैध खंडणी वसुली, कळंबोली कॉलनी मधील रस्त्यावरील खड्डे, विविध भाजीपाला मार्केट हॉकर्स यांच्याकडून होणारी अवैध हप्ता वसुली, गुंडगिरी, रिक्षाचालकांची मनमानी इत्यादी समस्यासह विविध नागरी समस्या सदर बैठकीमध्ये मांडल्या.

सर्वांनी मिळून कळंबोली रोडपाली खडकपाडा परिसरामधील सिडको कॉलनी एरियातील रहिवाशांसाठी, त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी कळंबोली कॉलनी फोरमची स्थापना केली.

सदरची बैठक यशस्वी होण्यासाठी, शिवशंभु प्रतिष्ठानचे दिनेश तिडके व त्यांचे सहकारी, कळंबोली शिवजयंती आयोजका मधील प्रशांत रणवरे, गिरीश धुमाळ, महेश गुरव, अवधूत साळुंखे, महादेव क्षिरसागर, गौरव गव्हाणे, राहुल शिंदे व त्यांचे सहकारी, बांधिलकी प्रतिष्ठानचे विविध तरुण मंडळी, स्वराज्य युवा मित्र मंडळ, जॉगर्स ग्रुप, मराठवाडा मित्र मंडळ मधील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button