नवी मुंबई

मालमत्ता कराची दुबार देयके / दुरुस्ती कार्यवाहीला विशेष समितीव्दारे गती

119 थकबाकीदार मालमत्ता जप्त करून सदर भूखंड / मिळकती विक्रीच्या कार्यवाहीचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर मिळकत धारक / मालक यांनी मिळकतीची विक्री / गहाण / दान या अथवा अन्य प्रकारे मालकी हक्कामध्ये बदल करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून 21 दिवसाच्या आत मिळकतीवरील कराची रक्कम वसूलीच्या खर्चासह महानगरपालिकेकडे जमा केली नाही तर मिळकतीची विक्री करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.

याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी तसेच दुबार देयके आणि देयकांमधील दुरुस्त्या याकरिता स्थापित समितीच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेत यामधील प्रत्येक मालमत्तेचा प्रकरणनिहाय तपासणी करावी असे निर्देश दिले.

दुबार देयके / देयकांमधील दुरुस्त्या याबाबतची प्रक्रीया नियमानुसार अत्यंत योग्य रितीने व पारदर्शकपणे व्हावी याकरिता मालमत्ता कर विभागाव्यतिरिक्त इतर अधिका-यांची समिती स्थापन करण्यात आली असून याबाबत करावयाच्या कार्यवाहीची प्रमाण कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आलेली आहे. सदर कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करून प्रत्येक आठवड्याला समितीची बैठक घेण्यात यावी व त्यामध्ये समितीपुढे आलेल्या प्रकरणांवर सखोल विश्लेषण व्हावे असे निर्देश आयुक्तांनी दिले.

दुबार देयकांबाबतचे कामकाज हे अत्यंत जबाबदारीने करावयाचे असून यामध्ये क्षेत्रीय अहवाल (Field Report) हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याबाबतची क्षेत्र स्तरावरील पाहणी बारकाईने केली जावी व त्याचा रेकॉर्डही काळजीपूर्वक तपासला जावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या तपासणीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाचा संगणकीय तपशीलही अत्यंत महत्वाचा असून त्याचीही व्यवस्थित पाहणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. मोबाईल टॉवरच्या थकबाकीबाबत प्रकरणनिहाय अहवाल आठवड्यानंतरच्या पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

नोटिशीला प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांविरोधातील कार्यवाही अशीच सुरु ठेवून 25 ते 50 लाखामधील थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

मालमत्ता कराची दुबार देयके व देयकांमधील दुरूस्त्या अशा अडचणी दूर करून मालमत्ता कराच्या वसूलीला नियोजनबध्द स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी ही कार्यवाही विनासायास केली जावी. महत्वाचे म्हणजे दुबार देयके अथवा दुरूस्ती यासाठीचा अर्ज संबंधित खातेदाराने करून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज न पडता मालमत्ताकर विभागाने स्वत:हून याविषयीची कार्यवाही करावी व प्रलंबित मालमत्ताकर वसूलीसोबतच दुबार देयकांमुळे करदात्या नागरिकांना होणारा त्रास व मनस्ताप कमी करावा हा या कार्यवाहीमागील प्रमुख उद्देश असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.* मालमत्ताकराचे महापालिकेच्या महसूलामधील महत्व लक्षात घेऊन मालमत्ताकर वसूलीला वेग देण्याकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे बारीक लक्ष असून यादृष्टीने विभागातील कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button