पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस बनला आरोग्य उत्सव, महा-रक्तदान शिबिरात 255 रक्तबाटल्या संकलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस बनला आरोग्य उत्सव, महा-रक्तदान शिबिरात 255 रक्तबाटल्या संकलन
तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी मुंबईमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले.
श्रीगणेशजी नाईक ब्लड डोनर चैन अंतर्गत नवी मुंबईमध्ये रक्तदानाच्या विधायक उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा आज 15 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस या दोन्ही वाढदिवसाच्या निमित्ताने हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती अनंत सुतार, माजी नगरसेवक सुरज पाटील, भाजपाचे नवी मुंबई महासचिव सतीश निकम, भाजपाचे महामंत्री विजय घाटे, भाजपाचे लोकप्रतिनिधी, व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महा-रक्तदानाचा शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध प्रभागांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरिता हा अभिनव उपक्रम सुरू राहणार आहे. कोरोनाच्या काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता महा रक्तदानाचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या विधायक शुभेच्छा दिल्या आहेत.
महारक्तदान मोहिमेअंतर्गत पुढील शिबिर 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता केमिस्ट भवन सेक्टर 8 सानपाडा येथे पार पडणार आहे.
अवतरण….
वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. ही बाब लक्षात घेता पाच वर्षांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक आणि माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या माध्यमातून महा-रक्तदानाची मोहीम सुरू झाली. दर वर्षी हजारो नागरिक या मोहिमेत रक्तदान करतात. या मोहिमेअंतर्गत संकलित केलेले रक्त नवी मुंबईतील महापालिका तसेच विविध रक्त पेढ्यांना दिले जाणार आहे. वर्षातले 365 दिवस विविध ठिकाणी रक्तदान शिबिर भरवली जाणार आहेत. जी व्यक्ती रक्तदान करणार आहे त्याला गरजेच्यावेळी रक्त उपलब्ध होणार आहे. रक्तदान करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित करा अशी ही संकल्पना आहे. – डॉक्टर संजीव नाईक, माजी खासदार
लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्यावर नितांत प्रेम करणारे नवी मुंबईतील गाव गावठाण, नोड आणि झोपडपट्टी परिसरातील असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक महा-रक्तदानाच्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. ही मोहीम रक्तदानाचा विक्रम करेल, असा मला विश्वास आहे. – जयवंत सुतार, माजी महापौर
कोरोना काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे रक्त दान करण्याचे आवाहन करण्यात येते आहे त्यानुसार पंतप्रधान मोदी आणि लोकनेते नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनर चैनचा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो आहे. या उपक्रमात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करतो. रक्तदान करा आणि रक्तदान घ्या अशी ही अभिनव संकल्पना आहे. – दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकनेते आमदार गणेश नाईक या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाचा दुग्धशर्करा योग आला आहे. यानिमित्ताने हे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने यानिमित्त सेवा समर्पण सप्ताह राबविण्यात येणार असून या अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, लसीकरण इत्यादी विधायक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. – सतीश निकम, भाजपा महासचिव, नवी मुंबई
नवी मुंबईच्या जडणघडणीत अविरत कार्यरत असलेले लोकनेते आमदार गणेश नाईक आणि विकासाच्या बाबतीत देशाला उंची प्रदान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने श्री गणेशजी नाईक ब्लड डोनर चैन ही संकल्पना अस्तित्वात आली. रक्तासाठी कुणावरही वणवण भटकण्याची वेळ येऊ नये. यासाठी ही ब्लड डोनर चैन कार्यान्वित केली प्रत्येक रक्तदाता हा या साखळीचा भाग बनला आहे. वर्षातले 365 दिवस ही सेवा दिली जाणार आहे. या पवित्र कार्यात प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा. -सुरज पाटील, माजी नगरसेवक
चौकट…
भरगच्च समाजोपयोगी उपक्रम…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत आज विविध प्रभागांमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांच्या वतीने पार पडले. आश्रमातील मुलांना धान्य वाटप, पालिकेच्या रुग्णालयांमधून फळांचे वितरण, अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कर्तबगार महिलांचा सन्मान, कोरोना योद्ध्यांचा गौरव, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, मोफत मास्कचे वितरण, असंघटित कामगारांना ओळखपत्रांचे वाटप, मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप, असंघटित क्षेत्रातील महिलांकरता इ श्रम यूएन कार्डचे वाटप, मोफत विम्याचे वाटप, 18 ते 30 वयोगटातील नागरिकांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व लायसन्स वितरण शिबिर, दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार इत्यादी भरगच्च कार्यक्रम पार पडले.