पावसाळापूर्व कामांच्या आढाव्यांतर्गत नाले व गटारे सफाई कामांची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या आढावा बैठकींमध्ये पावसाळापूर्व कामांबाबत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज विविध ठिकाणांना भेट देत नैसर्गिक नालेसफाई तसेच पावसाळी गटारे साफसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई तसेच संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
नेरुळ विभागात हर्डेलिया कंपनीजवळून जाणारा मोठ्या नैसर्गिक नाल्यामध्ये सायन पनवेल महामार्गाखाली डोंगरातून वाहून येणारी माती व दगड साठल्याने त्या भागाची साफसफाई स्किड स्टियर लोडर या वेगळ्या प्रकारच्या यांत्रिक वाहनाव्दारे करण्यात येत असून ते काम जलद पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सायन पनवेल महामार्गाला समांतर जाणा-या कल्व्हर्ट बांधणीचे कामही गतीने पूर्ण करावे असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे रहेजा जवळील नाल्याचीही साफसफाई गतीने पूर्ण करावी त्यासाठी आवश्यकतेनुसार कामगार वाढविण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. महापालिका क्षेत्रातील सर्व मोठ्या नाल्यांची साफसफाई कामे कोणत्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत पूर्ण करावी असे आयुक्तांनी पाहणीमध्ये निर्देशित केले.
एलपी जंक्शनजवळ सायन पनवेल रस्त्याखालून शिवाजी नगर शिरवणे एमआयडीसीकडे जाणा-या कल्व्हर्टचे काम साफसफाई तातडीने करून प्राधान्याने पूर्ण करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.
वाशी सेक्टर 17 येथील सर्वात मोठा नाला सफाईबाबत अधिक संख्येने पोकलेन लावून तत्परतेने सफाई करावी असे निर्देशित करताना महापालिका क्षेत्रातील होल्डींग पॉँडवरील सर्व फ्लॅपगेट नवीन टाकून अथवा दुरुस्त करून कार्यान्वित राहतील याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे शहराचा काही भाग समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस व मोठ्या भरतीची वेळ एकच आल्यास त्याठिकाणी पाणी जमा होते अशा संभाव्य ठिकाणी जादा सक्षम पंप्सची तरतूद आत्तापासूनच करून ठेवावी अशाही सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.
वाशी सेक्टर 8 आणि सीबीडी बेलापूर सेक्टर 11 येथील पंपींग हाऊसच्या ठिकाणी भरतीच्या व पावसाच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पंप कार्यान्वित ठेवण्यात अडचण येऊ नये याकरिता त्याठिकाणी अतिरिक्त इलेक्ट्रीकल बॅकअपची व्यवस्था करण्याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
कोपरखैरणे विभागात पावसाळी गटरांच्या सफाईची पाहणी करताना आयुक्तांनी साफसफाईचे परिमाण जाणून घेतले. तसेच साफसफाई झाल्यानंतर झाकणांवर रंगाने या वर्षाचा 21 आकडा लिहिण्यात येतो त्याचीही पाहणी केली. सेक्टर 12 ए कोपरखैरणे तसेच सेक्टर 12 घणसोली येथील एमआयडीसीतून येणा-या मोठ्या नाल्याची पाहणी करताना आयुक्तांनी मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेप्रमाणेच विशेषत्वाने छोट्या नाल्यांच्या सफाईकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते तेथील साफसफाईवर व पाणी साचू नये यासाठी करावयाच्या पंपींग व इतर व्यवस्थेची दक्षता घेण्याचे सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक नालेसफाई व पावसाळी गटारे सफाईची कामे साधारणत: 85 टक्के पूर्ण झाली असून सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण व्हावेत यादृष्टीने गतीमानतेने काम करावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले व पुन्हा या कामांची पाहणी करणार असल्याचेही सूचित केले.