संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका दक्ष
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
-कोव्हीड रुग्णसंख्येत घट झालेली असली तरी संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेत नमुंमपा दक्ष
-ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दीड महिन्यात शून्य मृत्यूचे 29 दिवस- मृत्यू दरात घट
-कोव्हीड टेस्टींगप्रमाणेच लसीकरणावर भर
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिस-या लाटेचा धोका संपलेला नाही हे लक्षात घेऊन कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन कोव्हीड टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही.
सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, सोसायटी व वसाहतीत सर्वांचे टेस्टींग करण्यात येऊन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. दररोज सरासरी 7 हजारहून अधिक नागरिकांची कोव्हीड टेस्टींग करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 22 लक्ष 23 हजार 569 इतक्या कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शासन निर्देशानुसार आरटी-पीसीआर टेस्ट 60 टक्के आणि ॲन्टिजन टेस्ट 40 टक्के असे टेस्टचे प्रमाण कायम राखले आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 30हून अधिक आहे.
अशाप्रकारे रुग्णसाखळी खंडीत करण्यासाठी ट्रेसींग, टेस्टींग व ट्रिटमेंट अशा त्रिसूत्रीकडे बारकाईने लक्ष दिल्याने कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रित होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ न देणे व त्याचवेळी जास्तीत जास्त नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेऊन लस संरक्षित होण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे बारकाईने लक्ष आहे.
दिवाळीच्या उत्सवी कालावधीत कोरोना विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात होईल ही शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या सुट्टीच्या कालावधीतही कोव्हीड टेस्टींग सुरु ठेवण्यात आले होते. तसेच नागरिकांची लसीकरणाअभावी गैरसोय होऊ नये यादृष्टीने महापालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात आलेली होती.
माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोरोना बाधीतांच्या संख्येत तसेच मृत्यू दरातही मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसत असून ऑक्टोबर महिन्याच्या 31 दिवसात 17 दिवस शून्य मृत्यूचे तसेच नोव्हेंबर महिन्याच्या 22 दिवसात 12 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. अशाप्रकारे मागील दीड महिन्यात 29 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. मागील 18,19,20,21 या नोव्हेंबर महिन्याच्या सलग 4 दिवसात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोव्हीड मृत्यूदर 1.89 टक्के इतका कमी झालेला आहे.
मार्च 2020 पासून आत्तापर्यंत 1 लक्ष 9 हजार 163 इतक्या व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्या असून त्यामधील 1 लक्ष 6 हजार 895 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. अशाप्रकारे कोरोनामधून बरे होणा-यांचे प्रमाण (Recovery Rate) 97.92 टक्के इतके लक्षणीय आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेली कोरोना रूग्णसंख्याही 301 इतकी मर्यादीत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी (Doubling Rate) 3504 दिवस म्हणजेच साधारणत: 9.5 वर्षे इतका झालेला असला कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका दक्ष आहे.
कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट लांबविण्यासाठी टेस्टींगच्या प्रमाणात वाढ करण्यासोबतच मिळालेल्या कालावधीचा उपयोग करून घेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्यावर भर दिला जात आहे. आत्तापर्यंत लस तुटवड्याच्या काळातही लसीकरण केंद्र संख्या वाढवून व सुट्टीच्या दिवशीही लसीकरण केंद्र बंद न ठेवता लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार 18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका असून यापैकी 7 लक्ष 17 हजार 824 म्हणजेच 64.84 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
कोव्हीड टेस्टींगचे प्रमाण कायम राखताना रुग्ण आढळतो त्या सोसायटी, वसाहतींमधील टारगेटेड टेस्टींगप्रमाणेच एपीएमसी मार्केट व रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड टेस्टींग केंद्रे अथक कार्यरत करण्यात आलेली आहेत. लसीकरणासाठीही सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, 2 मॉल मध्ये ड्राईव्ह इन लसीकरण तसेच इएसआय हॉस्पिटल वाशी येथील जम्बो लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. याशिवाय “हर घर दस्तक अभियान” अंतर्गत नागरिकांच्या घराजवळ जाऊन लसीकरण करण्यात येत असून 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात आत्तापर्यंत 206 सत्रांमध्ये 13 हजार 551 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय वाशी, नेरुळ व घणसोली या रेल्वे स्टेशन्सवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत 23 सत्रांमध्ये 2150 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबईकर नागरिक लवकरात लवकर लस संरक्षित व्हावेत यादृष्टीने लसीकरणाला वेग देण्यात येत आहे.
कोव्हीड विरोधी लढा नियोजनबध्दरित्या राबवित टेस्टींगवर भर व लसीकरणाला गती याव्दारे ऑक्टोबरपासून मागील दिड महिन्यात कोरोना बाधीतांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत असून दिवाळीनंतरच्या कालावधीतही दैनंदिन रुग्णसंख्या 20 ते 30 दरम्यान येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि कोरोनाचा धोका अजून टळलेला नसून ज्या नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे त्यांनी लस संरक्षित होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर महानगरपालिकेच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन त्वरीत मोफत लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाले असले तरी मास्कचा नियमित वापर करावा तसेच कोरोना सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.