लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्टींग करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रेसर
कोव्हीडच्या दुस-या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत असून कोरोना रुग्णांचे दैनंदिन बाधीत प्रमाण स्थिर होताना दिसत आहे. अशावेळी संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड टेस्टींगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली असून टारगेटेड टेस्टींगवर भर दिलेला आहे. याव्दारे ज्या इमारतीत कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्ण सापडतो त्या इमारतीतील सर्व नागरिकांचे टेस्टींग करण्यात येत आहे. याशिवाय एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स, मार्केट अशा वर्दळीच्या ठिकाणीही टेस्टींग वाढीवर भर देण्यात आलेला आहे. सध्या दररोज 7 हजारहून अधिक नागरिकांची कोव्हीड टेस्टींग केली जात असून मागील 15 दिवसात 99 हजार 856 म्हणजे साधारणत: 1 लाख नागरिकांची कोव्हीड टेस्टींग करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या साधारणत: 15 लक्ष असून त्यामध्ये 13 लक्ष 6 हजार 517 कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्ट करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रभागी आहे.
कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट जितकी उशीरा येईल तितकी हानी कमी होईल हे लक्षात घेऊन तिस-या लाटेचा प्रादुर्भाव विलंबाने सुरु होण्याकरिता कोव्हीड विषाणूला आहे त्याच ठिकाणी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता रुग्णशोधावर लक्ष केंद्रीत करून हॉटस्पॉट एरीयामध्ये टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. एखाद्या इमारतीमध्ये एक रूग्ण जरी आढळला तरी ती इमारत हॉटस्पॉट जाहीर करून इतर रहिवाशांमध्ये कोव्हीडचा प्रसार होऊ नये याकरिता इमारतीमधील प्रत्येक नागरिकाचे टेस्टींग करण्यात येत आहे.
या टेस्टींगच्या माध्यमातून कोव्हीडची कोणतीही दर्शनी लक्षणे दिसत नसलेले (Asymptomatic) रुग्ण, जे सर्वसाधारणपणे सापडले नसते मात्र त्यांच्यामार्फत कोव्हीडचा प्रसार झाला असता असे रुग्ण निदर्शनास येत असल्याने त्यांचे त्वरीत विलगीकरण करून कोव्हीडची साखळी रोखणे शक्य होत आहे. अशा सर्वसाधारण भासणा-या व कोव्हीडची कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या पॉझीटिव्ह रुग्णांमुळे कोव्हीडचा प्रसार जलदगतीने वाढू शकतो हे लक्षात घेऊन संबंधीत नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून इमारतीमधील सर्व रहिवाशांचे कोव्हीड टेस्टींग करण्यात येत आहे. याकरिता नागरी आरोग्य केद्रांना दैनंदिन टेस्टींगचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
अशाप्रकारे टेस्टींगमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आज जरी रुग्णांची संख्या काहीशी वाढलेली दिसली तरी भविष्यात कोव्हीडचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यात आजच्या टेस्टींगची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
सद्यस्थितीत डेल्टाप्लस व्हॅरियंटचे रुग्ण नजीकच्या शहरांमध्ये सापडलेले असून डेल्टाप्लस व्हॅरियंटचा तसेच कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन आत्तापासूनच अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता लक्षात घेत *नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड टेस्टींगमध्ये व त्यातही टारगेटेड टेस्टींगमध्ये वाढ कऱण्यात आलेली आहे. याबाबत विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत असून सर्व लोकप्रतिनिधींनाही त्यांच्यामार्फत नागरिकांना टेस्टींगचे महत्व सांगावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पत्राव्दारे आवाहन केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीडचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी अगदी सुरुवातीपासून नियोजनबध्द पावले उचलण्यात येत असून सद्यस्थितीत कोव्हीडच्या तिस-या लाटेला अधिक काळ रोखण्यासाठी कोव्हीड टेस्टींगमध्ये करण्यात आलेली टारगेटेड वाढ हा देखील त्याच उपाययोजनांचा महत्वाचा भाग आहे याची जाणीव ठेवून समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ राखणे या कोव्हीड सुरक्षा त्रिसूत्रीचा नियमित अंगीकार करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
जाहिरात