प्लान इंटरनॅशनल तर्फे पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न; जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे महत्वपूर्ण योगदान
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई : प्लान इंटरनॅशनल संस्थेतर्फे पोक्सो व बाल संरक्षण कायद्याविषयी पत्रकारांसाठी दोन दिवसीय यशस्वी कार्यशाळेचे आयोजन लोणावळा येथे केले होते. यात नवी मुंबई, ठाणे,आणि रायगड येथील पत्रकारांनी सहभाग घेतला होता.
पोक्सो कायदा, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच या विरोधातील उपलब्ध कायदे व नियम तसेच पोलीस, रुग्णालय ह्यांची जबाबदारी व कर्तव्य याबद्दलची सखोल माहिती प्लान इंटरनॅशनलचे सी.पी. अरुण, सीडब्लूसीचे सदस्य तसेच प्लानचे सल्लागार सतीश शिंदें, प्लानचे तांत्रिक वरिष्ठ सल्लागार तुषार आंचल यांनी दोन दिवसीय कार्यशाळेत दिली.
बालविवाह, बालकामगार, महिला व बाल संरक्षण ह्या विषयांवर बातमी करताना पत्रकारांनी घेण्याची खबरदारी, कायद्यातील शिक्षेची तरतूद इत्यादी महत्वाच्या चर्चेत कधी गांभीर्य तर कधी हसतखेळत शारीरिक प्रत्यक्षिकांद्वारे पत्रकारांना अवगत करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक मीना नाईक यांच्या अभया ह्या महिला अत्याचारविरोधातील लढाईचे अप्रतिम एकपात्री नाटक उपस्थितांचे हृदय हेलावून टाकणारे ठरले.
जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशने या कार्यशाळेच्या नियोजनात महत्वाचा सहभाग दिला. संघटनेचे अध्यक्ष अशोक शेशवरे यांनी कार्यशाळेचे आयोजक प्लानचे सी.पी. अरुण ह्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला व भविष्यातील प्लानच्या अशा सामाजिक उपक्रमात आमची संघटना सदैव सोबत असेल अशी ग्वाही दिली.
लोणावळा येथील निसर्ग सुंदर वातावरणात संपन्न झालेल्या ह्या कार्यशाळेत २५ हुन अधिक पत्रकारांनी अनेक महत्वाच्या मुद्द्याची, नियम, कायदयांची माहिती, सामाजिक भान, पत्रकार कर्तव्ये व अधिकार तसेच प्रभावित महिला व बालक यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा सामाजिक कार्यात
आणण्यासाठी उपलब्ध शासन व्यवस्था ह्याबद्दलची माहिती अधिक ज्ञानार्जन देणारी ठरली.
प्लानच्या इंटरनॅशनलच्या रणरागिणी शुभांगी रणखांबे व अदिती पांडे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका पार पाडली.