फणसांनी फुलला उरणचा बाजार, वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर फणस खरेदीसाठी गर्दी:
उरण (दिनेश पवार)
वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर उरण शहरात फणसाच्या राशीच्या-राशी पालवी हॉस्पिटल बाजूला, रॉयल हॉटेल समोर, उरण चारफाटा, बाजारपेठ आदी ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फणस खरेदीसाठी महिलांचो गर्दी उसळली आहे.
कोकणात फणसांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होत असते. रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात फणसांची मोठमोठे वृक्ष असून, तयार व कच्चे फणस उरणमध्ये विक्रीसाठी दाखल झाले असून लहानात लहान फणस १०० रु. तर त्यापेक्षा मोठा फणस १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. तसेच विक्रेते सध्या फणस कापून त्यामधील गरे किलोच्या दराने विकत आहेत.
कापून तयार असलेले गरे ५० रुपये पाव किलो व १०० रुपये अर्धा किलो तर १७० रुपये १ किलो अशा दरांमध्ये फणस गरे विकण्यात येत असल्याने व फणस कापण्याचा त्रास वाचत असल्याने व आजच्या धकाधकीच्या जिवनामध्ये फणसाचे गरे मिळत असल्याने कापून तयार असलेल्या गऱ्यांना नागरिकांकडून अधिक पसंती मिळत आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरही महिला फणस खरेदी करीत आहेत.
२४ जून रोजी वटपौर्णिमा असल्याने सध्या उरणच्या बाजारपेठेत फणसांच्या राशी ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत. वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. या व्रतासाठी लागणाऱ्या साहित्यासह आंबे, चिकू, जांभळे, करवंद, भोकरं, अळू आदी फळांनी बाजारपेठ फुलून गेली असून महिलावर्गाकडून या रानमेव्याला अधिक पसंती मिळत आहे.
फणसाच्या दोन जाती आहेत कापा फणस व बरका फणस असे दोन प्रकार आहेत. बरक्या फणसापेक्षा कापा फणसाला अधिक मागणी असल्याने बाजारात कापा फणसाची विक्री मोठ्या प्रमाणात दिसते.
१०० ते ५०० रुपयांपर्यंत फणसांची विक्री करीत असतो, कच्चे फणस ४० रुपये किलो या दराने आम्ही विकतो असे फणस विक्रेते दिनेश ठाकूर यांनी सांगितले.