10 ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार दि. 10 ते 12 जून 2021 या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने सर्व संबंधीत विभागप्रमुख तसेच सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांची वेब संवादाव्दारे बैठक आयोजित करीत या कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याकरिता सतर्क राहण्याच्या सूचना सर्व यंत्रणेला दिल्या.
अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या उद्देशाने विभाग कार्यालय स्तरावर आवश्यक तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देत कोणीही पुढील आदेश होईपर्यंत महापालिका क्षेत्र सोडू नये असे निर्देश आयुक्तांनी दिले व तशाप्रकारचे लेखी आदेशही त्वरीत जारी करण्यात आले.
सध्याचा कोव्हीड कालावधी लक्षात घेऊन कोव्हीडसह इतर कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवेत अडथळा होणार नाही याकरिता दक्षता बाळगण्याच्या सूचना करीत संभाव्य अतिवृष्टीमुळे होणारी पुरपरिस्थिती, वाहतुक कोंडी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतरही प्राधिकरणांशी समन्वय ठेवून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मदत व बचावकार्य पथकांनी सतर्क रहावे तसेच दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे, मोठ्या नाल्यांशेजारील घरे याठिकाणी अधिक दक्ष राहण्याचे आदेश विभाग अधिका-यांना देण्यात आले.
भरतीच्या वेळेत जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास नवी मुंबई शहरातील अनेक विभाग समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर असल्याने काही ठिकाणी पाणी साचते. त्यादृष्टीने होल्डींग पॉँड मधील फ्लॅपगेट तसेच पंपींग स्टेशन वीज पुरवठा खंडीत झाल्याने कार्यान्वित राहण्यात अडचण येऊ नये याकरिता आवश्यक बॅकअप ठेवण्याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. मागील अनुभव लक्षात घेता अतिवृष्टी व मुसळधार वा-यामुळे झाडे / झाडांच्या मोठ्या फांद्या पडल्यास त्या तत्परतेने उचलून घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी अधिकच्या पंप्सची तजवीज करून ठेवावी तसेच मदत व बचावासाठीचे सर्व साहित्य आणि यंत्रसामुग्री सुसज्ज राहील याची खातरजमा करून घेण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवून नागरिकांना स्थलांतरीत करावे लागल्यास त्यांच्याकरिता विभागातील शाळा / समाजमंदिरे याठिकाणी निवारा केंद्रांची तसेच त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशाही सूचना विभाग अधिकारी यांना देण्यात आल्या. महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्र व विभाग कार्यालयातील मदत केंद्र यांचे दूरध्वनी कायम सुरु राहतील याबाबतही दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले.
दिनांक 10 ते 12 जून 2021 रोजी दिलेल्या अतिवृष्टीच्या इशा-याच्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनाही सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात यावे असे आयुक्तांनी या बैठकीप्रसंगी सूचित केले.
त्यानुसार नवी मुंबईकर नागरिकांनी 10 ते 12 जून या कालावधीत खाडी, तलाव, नाले, खदाण, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेली ठिकाणे येथे जाऊ नये, मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी डोंगराळ भागात जाऊ नये, घराभोवती जोरदार वा-यामुळे विजेचे खांब, तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता लक्षात घेऊन घराबाहेर थांबू नये, आपली वाहने व्यवस्थित ठिकाणी सुरक्षितरित्या पार्क करून ठेवावीत, घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, विद्युत प्रवाह आणि गॅस प्रवाह बंद करावा, घरात बॅटरी, खाद्य पदार्थ, पाणी, कपडे अशा आवश्यक वस्तू हाताजवळ ठेवाव्यात, रेडिओ व दुरदर्शनवरील बातम्या, उद्घोषणा ऐकाव्यात, गरज भासल्यास अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, पाण्याच्या प्रवाहापासून दूर रहावे, वृक्षाजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
अतिवृष्टीच्या प्राप्त इशा-यानुसार महानगरपालिकेची यंत्रणा दक्षतेने कार्यरत राहणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही अडचण जाणवल्यास अथवा सत्य माहिती मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र महापालिका मुख्यालय येथे 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.