महाराष्ट्र

‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ ; ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ ला उदंड प्रतिसाद

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन यशस्वीरीत्या रविवारी पार पडलेल्या ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ स्पर्धेमध्ये तब्बल १७ हजार ८९० स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही खारघर मॅरेथॉन उदंड केली. ‘खारघर मॅरेथॉन’निमित्त पुन्हा एकदा स्पिरिटची अनुभुती झाली. कडाक्याच्या थंडीतही मॅरेथॉनमधला सहभाग हा दृष्ट लागण्यासारखा होता. या स्पर्धेतील पुरुष खुला गटात करण माळी तर महिला खुला गटात ऋतुजा सकपाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावित विजेतेपदाचा किताब पटकावला.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉनने आतापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड यावेळी मोडले. खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्या यांची उपस्थिती लाभली. तर प्रमुख पाहुणे म्हणून अदिम जाती मीना विकास असोसिएशनचे अध्यक्ष व आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक विमल कुमार मिना, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध बॉलिवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेत्री सई मांजरेकर, अभिनेते प्रसाद मंगेश, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती.

सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली. यंदाचा सहभाग सर्वात जास्त असल्याने आयोजकांकडून या सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यंदाची हि स्पर्धा १३ वी होती. स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, पत्रकार गट ०२ किलोमीटर अशा १३ गटात पार मॅरेथॉन पडली. त्या अनुषंगाने विजेत्या स्पर्धकांना एकूण २ लाख ९६ हजार रुपये रक्कम स्वरूपात तसेच मेडल, सर्टिफिकेट आदी बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, स्वयंसेवक, बक्षिस वितरण अशा विविध समित्या कार्यरत होत्या. यावेळी सर्व स्पर्धकांसाठी बिस्किटे, पाणी, ओआरएस एनर्जी ड्रिंक आयोजकांकडून मोफत देण्यात आले होते. त्याचबरोबर मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध प्री इवेंट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामधील विजेत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेल्या सोसायटी, शाळा व संस्थांना महासहभाग स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या झुम्बा आणि युगांतक रॉक बँडचा स्पर्धक आणि क्रीडा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. या मॅरेथॉनमध्ये विविध सामाजिक हिताचे संदेश देणाऱ्या सोसायटी, संस्थांचा सहभाग लक्षवेधी होता. त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या स्पर्धेला खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी उप महापौर सीता पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अनिल भगत, नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, मॅरेथॉन पंच कमिटीचे प्रभारी सुशिल इनामदार, यांच्यासह विविध संस्था, संघटना, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे नाही तर सर्वाना सोबत घेऊन जाणे आहे, त्या अनुषंगाने या मॅरेथॉनमध्ये फक्त खारघर धावला नाही तर संपूर्ण हिंदुस्थान धावला आहे. या मॅरेथॉनमध्ये जवळपास १८ हजार नागरिक धावले आहेत. सर्वाना एकसंघ आणणे खूपच कठीण असते पण लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी ते करून दाखविले आहे. त्यामुळे हि मॅरेथॉन सर्वाना सोबत घेऊन जाणारी ठरली आहे. त्या अनुषंगाने जगात आपल्या भारत देशाला एक नंबरचा देश करण्यासाठी अर्पण, समर्पण भावना सर्वानी अंगिकारली पाहिजे.” – माजी खासदार किरीट सोमैया

“रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खेळ आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत तर खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन खारघर मधील नागरिकांच्या सूचना ग्राह्य करण्याचे व समस्यांचे निवारण करण्यासाठी कार्यरत आहे. त्याच जोडीने अदिम जाती मीना विकास असोसिएशनने यात सहभाग घेऊन मॅरेथॉनमध्ये प्रोत्साहन दिले आहे. व्यसनमुक्तीसाठी खारघर उत्स्फूर्त धावली आहे, आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्वाना वाटचाल कायम ठेवायची आहे. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आतापर्यतचे मॅरेथॉनचे रेकॉर्ड मोडले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.” – आमदार प्रशांत ठाकूर

  • बक्षिसांचा तपशिल –

पुरुष खुला गट – अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक- करण माळी (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
द्वितीय क्रमांक – रामू पारधी (१५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
तृतीय क्रमांक- प्रमोद वाक्षे (१० हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
उत्तेजनार्थ २२ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र, मेडल.

महिला खुला गट – अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक- ऋतुजा सकपाळ (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
द्वितीय क्रमांक – सुप्रिया माळी (१५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
तृतीय क्रमांक- सोनी जैस्वाल (१० हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
उत्तेजनार्थ २२ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र, मेडल.

१७ वर्षाखालील मुले गट – अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- कुशल शिवारी (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- यश नाक्त्ती (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- इब्राहिम (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

१७ वर्षाखालील मुली गट – अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- देविका सोनावणे (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- संजीवनी दीपक (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- धनश्री घाडगे (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

१४ वर्षाखालील मुले गट – अंतर०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- सार्थक पाटील (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- आर्यश पाटील (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- आयुष यादव (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

१४ वर्षाखालील मुली गट – अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- मयुरी चव्हाण (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- पूजा सावंत (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- श्रिया पाटील (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

खारघर दौड – (वैयक्तिक, शालेय, सोयायटी, व इतर अशा चार गटात) – अंतर ०३ किलोमीटर
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक दौड (पुरुष गट) – अंतर ०२ किलोमीटर
प्रथम क्रमांक- सुरेंद्र दशवरे (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- सिताराम जितेकर (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- सुशिल गुप्ता (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

ज्येष्ठ नागरिक दौड (महिला गट) – अंतर ०२ किलोमीटर
प्रथम क्रमांक- अनिता वर्मा (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- रिता कांडपाळ (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- जसपाल कौर (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

पत्रकार गट – अंतर ०२ किलोमीटर
प्रथम क्रमांक- सुनिल तावडे (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक- सुनिल पाटील (०३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक- सुधीर शर्मा (०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button