नवी मुंबई

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन विशेष दक्षता घेण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, झिम्बावे अशा ओमायक्रॉँन या कोव्हीडच्या नवीन व्हॅरियंटच्या दृष्टीने जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांबाबत विमानतळापासूनच अत्यंत दक्षता घेतली जात असून नवी मुंबई महानगरपालिकाही याबाबत विमानतळ प्राधिकरणांशी संपर्क ठेवून यामधील नवी मुंबईशी संबंधित प्रवासी अथवा प्रवाशांच्या संपर्कात आलेले जोखमीचे नागरिक याविषयी माहिती घेऊन त्यांची त्वरीत तपासणी करीत आहे.

कर्नाटक राज्यात ओमायक्रॉन व्हॅरियंटचे रुग्ण आढळलेले असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी त्वरीत वेब संवाद साधत दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यामध्ये विशेषत्वाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासाननाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पाल करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. त्याचप्रमाणे औ मायक्रॉनच्या प्रसाराची तीव्रता अधिक आहे असा जगभरातील अनुभव लक्षात घेऊन या अनुषंगाने या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्कचा अनिवार्य वापर करणे तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढवून जलदगतीने दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

त्याचप्रमाणे कोव्हीड टेस्टींगचे दैनंदिन प्रमाण अधिक वाढविण्याचेही निर्देशित करण्यात आले. परदेशातून आलेल्या नागरिकांचे कोव्हीड टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी त्यांच्या विलगीकरणाकडे व विलगीकरण कालावधीकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. टेस्टींग करतानाही आरटी-पीसीआर टेस्टींगचे प्रमाण ॲन्टीजनच्या तुलनेत 60 टक्क्यापर्यंत असावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

ओमायक्रॉनचा प्रसार आधीच्या व्हॅरियंटपेक्षा झपाट्याने होतो असे इतर देशातींल अनुभवांवरून निदर्शनास येत असून त्यादृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. यामध्ये ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झालेले आहेत ते कोव्हीड बाधीत झाले तरी आरोग्य स्थिती गंभीर होण्याची भिती कमी आहे हे लक्षात घेऊन लसीकरणालाही वेग द्यावा व तत्परतेने दोन्ही डोस पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशीत करण्यात आले.

याकरिता नियमित लसीकरण केंद्रासोबतच रुग्णवाहिकांव्दारे मार्केट मधील वर्दळीच्या ठिकाणी केली जाणारी लसीकरण सत्रे वाढवावीत. त्याचप्रमाणे नेरुळ, वाशी व घणसोली रेल्वे स्टेशन प्रमाणेच नव्याने सुरु केलेल्या ऐरोली व कोपरखैरणे रेल्वे स्टेशनवरील लसीकरण केंद्रे अधिक सक्षमतेने कार्यान्वित करावीत असेही निर्देश आयुक्तांनी दिले. रेल्वे स्टेशनवरील लसीकऱण केंद्र व टेस्टींग केंद्रे यांची माहिती नागरिकांना होण्याकरिता रेल्वे स्टेशनवर फलक प्रदर्शित करणे तसेच माईकींगव्दारे प्रचार कऱण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

कोव्हीडचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असून ओमायक्रॉन पासून बचावासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे. कोव्हीड प्रतिबंधात्मक नवीन नियमावलीच्या अनुषंगाने स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांकडून मास्कचा नियमित वापर केला जावा याकरिता मास्क न वापरणा-या नागरिकांबाबत दंडात्मक मोहिमा तीव्र कराव्यात असे निर्देश सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना देण्यात आले.

परदेशी प्रवाशांबाबत शासनाने दिलेल्या नवीन प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात यावे असे सर्व वैद्यकीय अधिकारी यांना निर्देशित करीत आयुक्तांनी टेस्टींगमध्ये वाढ व लसीकरण अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे नागरिकांनीही भारतात कर्नाटकमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन बाधीत कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घ्यावी व मास्क हीच आपली सर्वात मोठी ढाल आहे हे लक्षात घेऊन मास्कचा नियमित वापर करावा व सुरक्षित अंतर राखावे आणि हात नियमित स्वच्छ ठेवावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button