नवी मुंबई

ऑलिंपिक आकाराचा जलतरण तलाव, आंतरक्रीडा संकुल, बस टर्मिनस वास्तूव्दारे नागरी सुविधेत लक्षणीय भर

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

आधुनिक शहर, स्वच्छ व सुंदर शहर, इको सिटी, एज्युकेशनल हब अशी नवी मुंबई शहराची वेगवेगळी ओळख जनमानसात रुढ असून येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करीत असल्यामुळे ‘स्पोर्ट्स सिटी’ अशीही नवी मुंबईची वेगळी ओळख प्रचलीत होताना दिसते आहे. विविध क्रीडा प्रकारांमधील जलतरण हा देखील एक महत्वाचा क्रीडा प्रकार असून अनेक नागरिक आरोग्य जपणूक व संवर्धनाच्या दृष्टीनेही पोहण्याला प्राधान्य देताना दिसतात.

नवी मुंबई महानगरपालिका विविध क्रीडा प्रकारांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आघाडीवर असून पोहण्याच्या दृष्टीने जलतरण तलाव निर्मितीकडे विशेष लक्ष दिले जाते. नवी मुंबईतील अनेक जलतरणपट्टू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर मानांकने प्राप्त करताना दिसत असून त्यांना सरावासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव निर्माण व्हावा याला प्राधान्य देण्यात येत आहे.

वाशी सेक्टर 12 येथील भू.क्र.196 व 196 ए हे भूखंड अनुक्रमे नमुंमपा परिवहन उपक्रमास आणि नवी मुंबई महानगरपालिकेस बस टर्मिनस तसेच आंतरक्रीडा संकुल व जलतरण तलाव या सार्वजनिक सुविधांकरिता सिडको मार्फत हस्तांरित करण्यात आले आहेत.

याठिकाणी एकात्मिकपणे बस स्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल व ऑलिम्पिक साईजचा तरण तलाव विकसित करण्याचे काम सुरु झाले असून तळमजला अधिक 8 मजले उंच अशी ही इमारत सप्टेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. याठिकाणी सद्यस्थितीत तिस-या मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे.

या इमारतीत तळमजल्यावर बस स्थानक, इलेक्ट्रीक चार्जींग स्टेशन, एनएमएमटी कंट्रोल रूम, स्पेअरपार्ट्स, स्टोरेज रूम, फुडकोर्ट, मलप्रक्रिया केंद्र, रेन वॉटर हार्वेस्टींग टँक अशा प्रकारची व्यवस्था आहे. याशिवाय पहिला, दुसरा, तिसरा (काही भाग) मजल्यावर चार चाकी व दुचाकी वाहनतळाची व्यवस्था, तिस-या मजल्याच्या उर्वरीत भागात स्पोर्ट्स हॉल, योगा रूम अशा सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय फिल्टरेशन प्लांट व बॅलन्सींग टॅंकची व्यवस्था आहे.

चौथ्या मजल्यावर 25 मी X 50 मी आकारमानाचा ऑलिम्पिक आकाराचा मोठा तरणतलाव असणार आहे. तरणतलावाच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याकरिता क्लोरिनसह ओझोनाईझ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून ते शरीरास अपायकारक नाही. चौथ्या मजल्यावरील उर्वरित भागात कॅफेटेरिया, जीम, मेडिटेशन सुविधा, प्रथमोपचार कक्ष, कॉस्च्युम रुम, व्हिआयपी लाँज, डेक एरिया, शॉवर रुम, मसाज रुम, लॉकर, चेंजींग रुम व प्रसाधनगृहाची व्यवस्था असणार आहे.

या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आंतरक्रीडा कक्ष, योग कक्ष, मिडिया रुम, स्पोर्ट्स हॉल असून सहाव्या व सातव्या मजल्यावर एनएमएमटी कार्यालये तसेच आठव्या मजल्यावर बँक्वेट हॉलची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे छतावर ऑनग्रीड सोलरपॅनल बसविण्यात येणार असून त्यामधून साधारणत: 188 किलो वॅट वीज निर्मिती होऊन या इमारतीच्या वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.

या बहुउपयोगी भव्यतम वास्तूतील ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव तसेच आंतरक्रीडा संकुल यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना माफक दरात आंतरक्रीडा खेळांच्या तसेच जलतरणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सेवेसाठी महत्वाचा असलेला परिवहन उपक्रम इंधन दर व इतर बाबींमुळे तोट्यात असूनही चालविला जात असून नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपक्रमास आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. या नुतन इमारतीमधील दुकाने / कार्यालये यामधून मिळणा-या नियमित भाड्यांमुळे परिवहन उपक्रमाचे आर्थिक सक्षमीकरण होणार असून ही इमारत उभारण्यासाठी झालेला खर्च या भाड्यामधून साधारणत: 11 वर्षामध्ये वसूल होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या नागरिकांसाठी शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणारी बस स्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल व ऑलिंपीक आकाराचा जलतरण तलाव असलेली ही भव्यतम वास्तू बहुउपयोगी असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button