जूने कपडे देऊन नवीन कपड्यांच्या खरेदीत सवलत देणा-या एच ॲण्ड एमच्या अभिनव उपक्रमाची प्रशंसा
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना ‘थ्री आर’ प्रणालीचा म्हणजेच कचरा कमी करणे (REDUCE), कच-याचा पुनर्वापर (REUSE) आणि कच-यावर पुनर्प्राक्रिया (RECYCLE) या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून अशा प्रकारचे उपक्रम राबविणा-या संस्था, आस्थापना यांना प्रोत्साहितही केले जात आहे.
अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम एच ॲण्ड एम या रेडिमेड कपड्यांच्या जगप्रसिध्द ब्रॅडच्या वतीने राबविला जात असून आपल्या घरातील जूने कपडे एच ॲण्ड एम च्या दुकानात देऊन त्या बदल्यात तेथून खरेदी करण्यात येणा-या नव्या कपडयांवर सवलत दिली जात आहे. थ्री आर मधील पुनर्वापर संकल्पनेला पूरक असणारा हा अभिनव उपक्रम असून या उपक्रमाला नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रोत्साहीत करण्यात येत आहे.
सीवूड नेरुळ येथील ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये असलेल्या एन ॲण्ड एम च्या शोरूममध्ये आपल्या घरातून पिशवीत भरून आणलेले जूने कपडे ठेवण्यासाठी विशिष्ट बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. सदर बॉक्समध्ये जून्या कपड्यांची पिशवी टाकल्यानंतर बॉक्सवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर खरेदी करण्यात येणा-या कपड्यांवर सवलतीचे कुपन दिले जात आहे. हा उपक्रम सर्वार्थाने ‘थ्री आर’ संकल्पनेला पूरक असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार या अभिनव उपक्रमाची नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही प्रसिध्दी केली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. मिताली संचेती, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांनी एच ॲण्ड एम च्या शोरूमला भेट देत त्यांची स्वच्छ सर्वेक्षणाला पूरक उपक्रम राबवित असल्याबद्दल प्रशंसा केली. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नागरिकांना प्राधान्य (People First) हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून “माझे शहर – माझा सहभाग” या घोषवाक्यानुसार वाटचाल सुरु असून घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध बाबींमध्ये वेगळे काम करणा-या व्यक्ती / संस्था यांना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रोत्साहित करण्यात येत आहे. एच ॲण्ड एम ब्रॅन्डने राबविलेला जूने कपडे देऊन खरेदी कऱण्यात येणा-या नवीन कपड्यांवर सवलत देण्याचा उपक्रम देखील अत्यंत अभिनव असून इतर आस्थापनांनीही अनुकरण करावा असा आहे.