नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजात अद्ययावतता व गतीमानतेसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
सतत नवनव्या गोष्टी शिकत राहिल्याने आपण माहितीदृष्ट्या अद्ययावत होतो व त्याचा दैनंदिन कामकाजावरही सकारात्मक परिणाम होतो असे सांगत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यालयीन कामकाज विषयक प्रशिक्षणाचा उपयोग करून नवी मुंबई महानगरपालिकेचे कामकाज अधिक सुनियोजित व गतीमान होईल असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, वन प्रशिक्षण संस्था, शहापूर यांच्या सहयोगाने आयोजित वर्ग 3 च्या अधिकारी, कर्मचा-यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त श्रीम. संध्या अंबादे, प्रशासकिय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे तसेच वन प्रशिक्षण संस्था शहापूर यांचे संचालक श्री. किशोरकुमार येळे व प्रशिक्षक श्री. प्रकाश मोहिते व श्री. अजय पाठक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी कार्यालयीन कामकाज विषयक प्रशिक्षणामुळे नवीन नियमांची आणि शासन निर्णयांची माहिती अधिकारी, कर्मचारी यांना मिळते तसेच दैनंदिन कामकाज करताना येणा-या अडचणींचेही परस्पर संवादातून निराकरण होते. त्यामुळे या प्रशिक्षणाचा उपयोग अधिकारी, कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर होतो हा अनुभव असून याकरिताच आयुक्तांच्या संकल्पनेतून महापालिका प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या कार्यालयीन कामकाज प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी 35 वर्षाचा प्रशिक्षण अनुभव असलेले यशदाचे प्रशिक्षक श्री. प्रकाश मोहिते यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांशी हसत खेळत संवाद साधला. यशदाचे मास्टर ट्रेनर तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासक अधिकारी श्री. अजय पाठक यांनी आपल्या 30 वर्षाच्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 तसेच सेवेच्या सर्वसाधारण शर्ती आणि महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम या तीन विषयांवर तीन सत्रांमध्ये मौलीक मार्गदर्शन केले.
उद्याच्या सत्रात सेवानिवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी श्री. जी.टी. महाजन हे महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 तसेच कार्यालयीन व्यवस्थापन – पत्र लेखन / टिपणी लेखन / नस्ती व्यवस्थापन त्याचप्रमाणे कार्यालयीन कार्यपध्दती व सहा गठ्ठा पध्दत या विषयांवर 3 सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे कामकाजात येणा-या अडचणी यावर अधिकारी, कर्मचारीवृंदाशी संवाद साधत समस्या निराकरण करणार आहेत व सर्जनशीलता या विषयावर संवाद साधणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या या कार्यालयीन कामकाज प्रशिक्षणाप्रसंगी उत्साहाने उपस्थित होते.