प्रभारी शहर अभियंत्यांच्या कार्यकाळातील कामे व त्यावरील खर्चावर श्वेतपत्रिका काढा
दि. ३१ मे २०२४
प्रति.
आयुक्त तथा प्रशिक्षक ,
नवी मुंबई महानगर पालिका,
नवी मुंबई .
सजग नागरिक मंच, नवी मुंबईच्या वतीने सादर,
विषय : प्रभारी शहर अभियंत्यांच्या कार्यकाळातील कामे व त्यावरील खर्चावर श्वेतपत्रिका काढा
महोदय,
गेल्या ३ वर्षांपासून शहर अभियंता या पदावर “प्रभारी शहर अभियंता” कार्यरत होते. शहर अभियंता हा विभाग महापालिकेतील सर्वात महत्वाचा विभाग ठरतो कारण ५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या अर्थसंकल्पातील सुमारे १५०० कोटी निधीचा वापर हा त्या विभागामार्फत केला जातो.
गेल्या ३ वर्षात मोठ्या प्रमाणावर “अनावश्यक ” कामांची “अनावश्यक” या अर्थाने जी कामे जनतेच्या दृष्टीने गरजेची नाहीत परंतू स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव प्रशासनाने काढलेली कामे भाऊगर्दी हि दिसून येते आहे. शहर अभियंता विभागातील अभियंते आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर करून विविध “नाविन्यपूर्ण परंतू अनावश्यक” कामांचा शोध लावताना दिसतात.
सजग नागरिक मंच नवी मुंबईने “अनावश्यक कामांच्या माध्यमातून जनतेच्या कररूपी निधीचा अपव्यय टाळावा” यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला असला तरी शहर अभियंता विभागाने त्यास केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणावर अनावश्यक कामे रेटून नेलेली आहेत.
सजग नागरिक मंचाचा दुसरा आक्षेप आहे तो करोडो रुपये खर्च करून देखील कामाच्या दर्जा योग्य नसणे बाबत. त्याची देखील दखल घेतली गेलेली नाही. सजग नागरिक मंचाच्या आक्षेपांना किती गौण स्थान दिले गेलेले आहे याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मागील आठवड्यातील प्रसंगाचे देता येईल. सेक्टर ३ बेलापूर प्रभागात ज्या ज्या ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण, ज्या ज्या फुटपाथचे नूतनीकरण प्रस्तावित आहे त्या त्या ठिकाणचे रस्ते, फुटपाथ अगदी सुस्थितीत आहे याचे व्हिडीओ, फोटो पाठवून आक्षेप नोंदवलेले होते. असेच आक्षेप महापालिका हद्दीतील अनेक रस्ते, फुटपाथ बाबत देखील नोंदवलेले होते. याची दखल घेत महापालिकेने हि कामे काही काळासाठी थांबवली होती परंतू कालांतराने ती पुन्हा रेटून नेण्यात आली.
अशाच प्रकारे सेक्टर ३ बेलापूर येथील रस्त्यांचे डांबरीकरण सुरु असताना डांबरीकरण सुरु असलेल्या रस्त्याचे बॅरिकेटिंग न करणे, योग्य प्रमाणात रोलिंग न करणे, काम झाल्यावर लगेचच वाहतूक सुरु करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलेही काम करताना रस्त्याची ‘INITIAL LEVEL” न घेणे [ INITIAL LEVEL हा अभियांत्रिकी कामाच्या, रस्ते कामाच्या बाबतीतील सर्वात मुख्य निकष असतो] याबाबतचे आक्षेप “दस्तुरखुद्द शहर अभियंता, कार्यकारी अभियंता” यांच्याकडे नोंदवले होते.
सदरील आक्षेपाचे निराकरण करण्याऐवजी पुढील कामे सुरु करण्यात आले व त्याची माहिती शहर अभियंत्यांना दिल्यानंतर त्यांनी सांगितले की मीच “काम ‘चालू’ ठेवण्याचे” आदेश दिलेले आहेत. हेच काम अगदी भर पावसात देखील ‘चालू’ होते. सर्वात महत्वाची बाब हि की इंडियन रोड कौन्सिलचा १५ मे नंतर डांबरीकरण करू नये हा नियम असताना आणि आयुक्तांनी तसे आदेश दिलेले असताना देखील या कामांसह अनेक ठिकाणी अगदी ३१ मे रोजी देखील डांबरीकरण सुरु आहे हे विशेष.
लोकशाही व्यवस्थेत महापालिकेचा कारभार हा जनतेच्या करातून चालवला जात असल्याने व प्रशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन देखील जनतेच्याच करातूनच दिले जात असल्याने महापालिका व तिचे प्रशासन हे जनतेस उत्तरदायी ठरते या मूलभूत तत्वाला तिलांजली देण्याचे काम शहर अभियंता विभागाने केलेले आहे.
एकुणातच नवी मुंबई महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विभाग, उद्यान विभाग, स्वच्छ सर्वेक्षण विभाग, लेखा विभागात यासह सर्वच विभागात “प्रशासकीय दबंगगिरी” मोठ्या प्रमाणावर वारंवार प्रचीतीस येते आहे. सजग नागरिक मंच या “प्रशासकीय दबंगिरीचा” तीव्र निषेध करत आहे.
शहर अभियंता, विविध झोनचे कार्यकारी अभियंता व सजग नागरिक मंचाचे सदस्य यांच्यातील मिटिंग मध्ये सजग नागरिकांनी हे मत नोंदवले होते की आमचे सदस्य हे काही अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ वा जाणकार नसून जर घेतलेले आक्षेप ‘गैर वा अज्ञानातून केले गेलेले असतील ‘ तर त्याचे निराकरण करण्यात यावे. यास अनुसरून शहर अभियंत्यांनी आश्वासित केले होते की “सजग नागरिक मंचाने रस्ते, फुटपाथ, नाले यांच्या बाबतीत अभियांत्रिकीय दृष्टीने उपस्थिती केलेल्या आक्षेपांचे प्रत्यक्ष फिल्ड व्हिजिट करून निराकरण केले जाईल. परंतू हे निवेदन सादर करेपर्यत तरी असा कुठलाही प्रतिसाद सजग नागरिक मंच नवी मुंबईस प्राप्त झालेला नाही.
प्रमुख मागणी : “प्रभारी शहर अभियंत्याच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर दिसून आलेली अनावश्यक कामांची पुनरावृत्ती व सदरील कामांच्या दर्जाबाबत सजग नागरिक मंचाचे आक्षेप असल्याने या कार्यकाळात झालेल्या कामांवरील खर्चावर प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी व तसेच तटस्थ यंत्रणेच्या माध्यमातून दर्जाची पडताळणी करूनच बिले आदा करण्यात यावीत “.
त्याच बरोबर सदरील कार्यकाळातील कामांच्या दर्जाचे ” प्रशासकीय उत्तरदायित्व” हे शहर अभियंत्यांचे असल्याने त्यांच्या कार्यकाळातील निधीचा वापर व करण्यात आलेल्या कामांचा दर्जा याची शहानिशा करूनच त्यांना निवृत्ती पश्चात देय असलेल्या आर्थिक लाभ दिले जावेत.
सदरील निवेदनाची योग्य दखल घेतली जाईल हि अपेक्षा.
कळावे ,
आपले विनीत
सजग नागरिक मंचाचे सर्व सदस्य .
Email for correspondence : alertcitizensforumnm@gmail.com
कार्यवाही साठी प्रत सविनय सादर :
१) मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य
२) मा . नगर विकास सचिव , मंत्रालय
३) मा . उपायुक्त प्रशासन , नवी मुंबई महानगरपालिका
४) मा . नगरसचिव, नवी मुंबई महानगरपालिका .
५) मा . मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी
६) मा . शहर अभियंता , नवी मुंबई महानगरपालिका .
७) मा . संलग्न कार्यकारी अभियंता, शहर अभियंता विभाग