देशनवी मुंबई

ओमिक्रोन या कोव्हीडच्या नव्या व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर – आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे सतर्कतेचे निर्देश

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वान, हाँगकाँग मध्ये आढळलेल्या ओमिक्रोन या कोव्हीडच्या नव्या व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने दक्षता घेण्याचे सूचित केले असून त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभाग व विभाग अधिकारी यांची वेबसंवादाव्दारे तात़डीने बैठक घेत अधिक सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

कोरोना बाधितांची दैनंदिन रूग्णसंख्या काहीशी कमी झालेली दिसत असली तरी कोरोना अजून संपलेला नाही हे लक्षात घेत महानगरपालिकेने दैनंदिन कोव्हीड टेस्टींगचे प्रमाण 7 हजारापर्यंत राखले आहे. त्यातही ज्याठिकाणी कोरोनाबाधित आढळतो त्या इमारतीतील, वसाहतीतील प्रत्येकाचे टेस्टींग करून कोरोनाच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. टेस्टींगचे प्रमाण अजिबात कमी होऊ न देता नव्या व्हॅरिएन्टच्या पार्श्वभूमीवर टेस्टींगमध्ये आरटी-पीसीआर टेस्टचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड लसीकरणाच्या पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले असले तरी दुस-या डोसचे सध्या 67 टक्के साध्य झालेले उद्दिष्ट लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या ‘हर घर दस्तक अभियान’ प्रभावीपणे राबविले जात असून त्यासोबतीनेच ‘लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मार्केट क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी रूग्णवाहिका थांबवून केले जाणारे लसीकरण तसेच रेल्वे स्टेशनवरील लसीकरण रेल्वे स्टेशन्समध्ये वाढ करून अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

सद्यस्थितीत रूग्णसंख्या काहीशी कमी झालेली दिसली तरी कोव्हीड अद्याप संपलेला नाही याची जाणीव नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी कोव्हीड विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्क, सतत हात धुणे व सुरक्षित अंतर या कोव्हीड सुरक्षा त्रिसूत्रीचेच पालन करणे महत्वाचे आहे हे नागरिकांना लक्षात आणून देण्यासाठी विविध सोशल माध्यमांव्दारे याविषयीचा प्रचार वाढवावा असे सूचित करीत आयुक्तांनी सर्व विभाग अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्रात कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याविषयी माईकींगव्दारे नागरिकांमध्ये जागरूकता आणावी तसेच नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश दिले.

संभाव्य तिसरी लाट आलीच तर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सक्षमतेकरिता पूर्वतयारी करण्यात आली असून  ऐरोली व नेरूळ येथील महापालिका रूग्णालयांचे आयसीयू बेड्स आणि व्हेटिलेटर्स सुविधांसह कोव्हीड रूग्णालयात रूपांतरण करण्यात आले आहे. त्याविषयीच्या कार्यवाहीचा तसेच ऑक्सिजन पुरवठा प्रणालीच्या कार्यवाहीचा आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते. यामध्ये वेबसंवादाव्दारे दोन्ही परिमंडळ उपआयुक्त तसेच आठही विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त आणि सर्व रूग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिक्षक / वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या मर्यादीत झालेली दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोव्हीड सुरक्षा नियम पालनाच्या दृष्टीने काहीशी शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात घेणे व मास्कचा वापर अनिवार्यपणे करणे अत्यंत गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोनाचा व्हेरिएंट आपल्याकडे येऊ नये याकरिता शासकीय पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र नागरिकांनी समाजात वावरताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करून कोरोना विषाणूचा प्रसार रोखावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button