नवी मुंबई

नमुंमपाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विचारांचे ऊर्जापीठ – साहित्यिक श्री. उत्तम कांबळे

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील तसेच जगभरातील विविध स्मारके पाहिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक ख-या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांशी समरस झालेले असून उद्याच्या पिढीसाठी हे स्मारक विचारांचे विद्यापीठ होईल असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सुप्रसिध्द साहित्यिक श्री. उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला.

सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘ग्रंथ घडविती माणूस’ या विषयावरील व्याख्यान प्रसंगी विचारामुळे माणूस घडतो व ग्रंथ त्याच्या आयुष्याला आकार देतात असे मत व्यक्त करीत वाचन म्हणजे केवळ पुस्तकातील शब्द व अक्षरे यांचे वाचन नाही तर वाचलेल्या गोष्टींचे मनन, चिंतन म्हणजे पूर्णार्थाने वाचन आहे असा विचार त्यांनी व्यक्त केला.

भवताल वाचता वाचता, आतले मन वाचायचे हे वाचनाचे ढोबळ मानाने दोन प्रकार असल्याचे सांगत माणूस स्वत:ला वाचत गेला व त्यातूनच लिहित गेला असा वाचन प्रवास त्यांनी कथन केला. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर ग्रंथ केवळ शब्दांची गोळाबेरीज करीत नाहीत तर मनातले भय व शंका दूर करतात अशा शब्दात ग्रंथांचे महत्व अधोरेखीत करीत ग्रंथ हे भविष्यातील विकासाची प्रेरणा असतात हे सांगताना त्यांनी त्यांच्या लहानपासूनचे अनेक अनुभव कथन केले.

आपले वर्गमित्र माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.पाटील यांच्यासारखे वक्तृत्व स्पर्धांमध्ये आपल्याला बोलता यायला हवे हा ध्यास घेऊन शिक्षिकेने सल्ला दिल्याप्रमाणे दिवसाला 1 पुस्तक याप्रमाणे सतत 2 वर्षे 750 हून अधिक विविध विषयांवरील पुस्तकांचे मन लावून वाचन केल्यानंतर आपण घडलो असा स्वानुभव कथन करीत श्री. उत्तम कांबळे यांनी पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब एकमेव व्यक्तीमत्व होते असे सांगत तशा प्रकारचा ध्यास घेऊन वाचन करा असे आवाहन केले.

ग्रंथ समाजावर प्रेम करायला शिकवतात आणि ग्रंथ हेच समाजाचे ऋण व्यक्त करण्याचे माध्यम आहे त्यामुळे ग्रंथांची सोबत ही आयुष्यभर पुरते व आयुष्य घडविते हे स्वत:च्या अनुभवातून ठामपणे सांगू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई महानगरपालिकेने बाबासाहेबांच्या स्मारकात विचारांचे आदान-प्रदान करण्याचा निश्चय व्यक्त केला व त्याला लगेच सुरुवातही केली हे कौतुकास्पद असून येथील संपन्न ग्रंथालय व इतर सुविधांमुळे हे स्मारक ऊर्जेचे प्रेरणा स्त्रोत आहे व त्यामध्ये अधिकाधिक उत्तम गोष्टींचा समावेश होत दिवसेंदिवस प्रभावी होत जाईल असा विश्वास साहित्यिक श्री. उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला.

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महानगरपालिकेने उभारलेले बाबासाहेबांचे स्मारक त्यांच्या ज्ञानसंपन्न उत्तुंग कर्तृत्वाला साजेसे असावे यादृष्टीने विविध विचारवंत, अभ्यासक यांची व्याख्याने आयोजित करून येथे विचारांचा जागर व्हावा ही संकल्पना होती व ती आज पूर्णत्वास येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा कार्यक्रमांचे सातत्य राहण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन केले असून या स्मारकातून नागरिकांना सतत विचारांची प्रेरणा मिळत राहील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून नागरिक या व्याख्यानाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button