नमुंमपा क्षेत्रातील विद्यार्थी 2020-21 शिष्यवृत्ती योजना अर्ज स्विकृतीस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी योजनांमध्ये विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट 2021 पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या मुदतीस वाढ देण्याविषयी नागरिकांकडून महापालिका आयुक्त यांचेकडे मागणी करण्यात येत होती.
या मागणीचा सर्वोतोपरी विचार करून कोणताही पात्र विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सदर अर्ज स्विकृती दिनांकाच्या अंतिम मुदतीस 1 महिन्यांची वाढ जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज दाखल करता येतील.
या शिष्यवृत्ती योजनांमध्ये –
(1) विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(2) आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(3) इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(4) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(5) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(6) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
– अशा 6 घटकांचा समावेश आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेची 8 विभाग कार्यालये, नमुंमपा संचलित सर्व ग्रंथालये तसेच समाज विकास विभाग, बेलापूर भवन, 1 ला मजला, से.11, सी.बी.डी. बेलापूर आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय भूखंड क्रं.1, किल्लेगांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टऱ 15 ए, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी शासकीय व सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज जमा करता येतील. अंतिम दिनांकानंतर म्हणजेच दि.30 सप्टेंबर 2021 रोजी, सायं. 6.15 नंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता दिलेल्या 1 महिन्याच्या मुदतवाढीचा महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.