नवी मुंबई

नमुंमपा क्षेत्रातील महिला व मुलींना टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

शिवणकलेची आवड व त्याविषयीचे रितसर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व पात्र असणा-या महिला व मुलींकरीता नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने टेलरिग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकार मान्यताप्राप्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून हे टेलरिंग प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.

महिला सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने राबविल्या जात असताना टेलरिंगच्या माध्यमातून महिला व मुलींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणारा हा उपक्रम आहे.

सन 2021-22 वर्षातील या सहामाही व्यवसाय अभ्यासक्रमाचे 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2021 असे प्रवेश सत्र आहे. यामध्ये दोन व्यावसायिक अभ्यासक्रम असून पहिल्या शिवण – कर्तन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 7 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असून यामध्ये लहान मुले, स्त्रिया व पुरुष यांचे एकूण 30 प्रकारचे कपडे तयार करण्याचे शिकविण्यात येते. त्याचप्रमाणे दुस-या स्पेशलायझेशन इन ब्लाऊज अभ्यासक्रमासाठी इ. 8 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असून त्यासोबत शिवण -कर्तन ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणा-या महिला व मुली यांनाच घेता येणार असून प्रवेश घेताना मालमत्ता कराची पावती, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड यापैकी एक वास्तव्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांत उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रियेकरीता शाळेचा दाखला व गुणपत्रक असणे आवश्यक असून विवाहीत महिलांसाठी विवाह नोंदणी दाखला आवश्यक आहे. तसेच स्वत:चे आधार कार्ड व पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. हे टेलरींग प्रशिक्षण पूर्णत: मोफत असून केवळ शासनाचे परीक्षा शुल्क रक्कम भरणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 20 सप्टेंबर असून प्रवेश शुल्क रू. 300/- आहे. अंतिम दिनांकानंतर 21 ते 30 सप्टेंबरपर्यंत रू. 50/- विलंब शुल्कासह रू. 350/- इतकी प्रवेश शुल्क रक्कम भरून प्रवेश घेतला जाऊ शकतो.

टेलरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणा-या महापालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या महिला व मुलींनी नवी मुंबई महानगरपालिका टेलरिंग क्लास, दत्तगुरूनगर, न.मुं.म.पा. ग्रंथालय, दुसरा मजला, से.15, वाशी, नवी मुंबई येथील वर्गशिक्षिका यांचेशी 9867185830 या मोबाईल क्रमांकावर तसेच जुने ग्रामपंचायत कार्यालय, खैरणे-बोनकोडे, नवी मुंबई येथील टेलरिंग क्लासच्या वर्ग शिक्षिका यांचेशी 9769901354 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अथवा समाजविकास विभाग कार्यालय, पहिला मजला, बेलापूर भवन, से.11, सी.बी.डी.,बेलापूर, नवी मुंबई येथे संपर्क साधावा अथवा अधिक माहितीसाठी 022-27567279 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9372106976 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

तरी शिवणकलेची आवड असणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व मुलींनी या टेलरिंग प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button