आता रुग्णालयांमध्येच महापालिका अधिकारी डिस्चार्जपूर्वी करणार कोव्हीड देयकांचे लेखा परीक्षण
खाजगी रुग्णालयांकडून कोव्हीड विषयक उपचारांच्या आकारण्यात येणा-या देयकांबाबत नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre)” कार्यन्वित केला असून प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून संभाव्य देयक घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे.
आज याबाबतचा आढावा घेताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हे कामकाज अधिक प्रभावीपणे व्हावे व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळावा याकरिता रूग्णालयामार्फत डिस्चार्जपूर्वी देण्यात येणा-या संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी त्याच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने कोव्हीड उपचार करणा-या रुग्णालयामध्ये महानगरपालिकेचा अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश दिले. याप्रसंगी समितीच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, समितीचे नियंत्रण अधिकारी श्री. राजेश कानडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे उपस्थित होते.
दि. 15 मे रोजी याबाबतच्या विशेष बैठकीमध्ये आयुक्तांनी 1 एप्रिलपासूनच्या खाजगी रुग्णालयांमधील देयकांचे लेखा परीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. सदर कार्यवाही सुरु असून त्याबाबतचा आढावा आयुक्तांनी आजच्या बैठकीत घेतला. त्याचप्रमाणे रुग्णालयांकडून डिस्चार्जपूर्वी 48 तास आधी संभाव्य देयक मिळण्यात येणा-या अडचणी लक्षात घेत संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी रुग्णालयांमध्येच महानगरपालिकेचा अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले.
देयकांच्या पोस्ट ऑडिटपेक्षा प्री ऑडिट करणे रुग्णांच्या व नातेवाईकांच्या दृष्टीने आर्थिक हिताचे व सुविधेचे आहे हे लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये देयकांच्या लेखा परीक्षणासाठी अधिकारी नेमण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नियुक्त अधिका-याने देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतरच रुग्णाच्या नातेवाईकांनी देयक अदा करावयाचे आहे. त्यास अनुसरून रुग्णालयांची बेड्स क्षमता लक्षात घेऊन तेवढ्या संख्येने अधिका-यांची नेमणूक करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
कोव्हीड रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणी करताना कोव्हीडपश्चात निदान होणा-या म्युकरमायकोसिस वरील उपचारांचीही देयके तपासणी करावी असेही आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिसचे उपचार हे सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्येच होऊ शकतात हे लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा असणा-या रुग्णालयांनीच म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी दाखल करून घ्यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
खाजगी कोव्हीड रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. 21 मे 2020 व 30 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार कोव्हीड 19 संसर्ग बाधित रूग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या बॉम्बे नर्सिंग होम (अमेन्डमेंट) ॲक्ट 2006 नुसार नोंदणीकृत ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर ( विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)’ यांना मार्गदर्शक सूचनानुसार रुग्ण सुविधांचे दर निश्चित केलेले आहेत.
त्यानुसार देयके आकारणे रुग्णालयांना बंधनकारक असून त्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘कोव्हीड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre)’ येथे 022-27567389 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर तक्रार दाखल करावयाची असल्यास cbcc@nmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा 7208490010 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठवाव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.