आता नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कोव्हीड लसीकरण विशेष केंद्रे कार्यान्वित
कोव्हीड लसीकरणामध्ये संपूर्ण संरक्षणासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे हे लक्षात घेत पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्यानंतर आता दुसरा डोसही प्रत्येक नागरिकाने विहित वेळेत घ्यावा व नवी मुंबईकर नागरिकांच्या लवकरात लवकर 100 टक्के लसीकरण पूर्ण होऊन संरक्षित व्हावेत याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच लसीकरणाचे सुयोग्य नियोजन करीत 101 पर्यंत लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली असून सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी अगदी दिवाळी सणातही काही लसीकरण केंद्रे सुरू ठेवत लसीकरणामध्ये एकही दिवसाचा खंड पडू दिला नाही.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आजपासून मोठ्या प्रमाणात वर्दळ असणा-या नेरुळ व वाशी या दोन रेल्वे स्टेशनवर विशेष लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. सकाळी 9 ते 5 या वेळेत ही लसीकरण केंद्रे कार्यरत असणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविताना कोरोना विषाणुची साखळी आहे तेथेच खंडीत करण्यासाठी टेस्टींगवर भर दिला असून महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन्सवर कोव्हीड टेस्टींग केंद्रे सुरु ठेवली आहेत. त्यामध्ये आता नागरिकांना संपूर्ण लस संरक्षित कऱण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून पहिल्या टप्प्यात नेरुळ व वाशी या दोन रेल्वे स्टेशनवर विशेष लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. लवकरच इतरही रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरु करण्याचे नियोजन असून नागरिकांनी कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी अथवा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस लगेच घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.